उल्हासनगर : शहरात अवैध व धोकादायक इमारतीचा प्रश्न उभा ठाकला असून शहरवासीयांना विस्थापित होऊ देणार नसल्याचे आश्वासन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिले. तसेच पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व संबंधितांची बैठक घेऊन मार्ग काढू असे संकेत दिले.
उल्हासनगर महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी मोहिनी पॅलेस व साईशक्ती इमारतीचा स्लॅब पडून १२ जणांचा बळी गेल्याच्या पाश्वभूमीवर १० वर्ष जुन्या १५०० पेक्षा जास्त इमारतीला स्ट्रॅक्टरल नोटीसा दिल्याने, धोकादायक इमारतीचा प्रश्न उभा ठाकला. तसेच सावधगिरीचा उपाय म्हणून धोकादायक यादीतील ११६ इमारतीचे पाणी व वीज पुरवठा खंडित करून काही इमारतीवर तोडू कारवाई सुरू केल्याने, शहरात संभ्रमाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले. उल्हासनगर ट्रेड असोसिएशन व धोकादायक इमारती मधील रहिवाशांनी इमारतीच्या पुनर्बांधणी साठी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे साकडे घातले. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी पक्षाची जिल्हाध्यक्ष व माजी खासदार आनंद परांजपे शहरवासीयांच्या समस्या ऐकण्यासाठी शहरातील ईगल हॉटेलमध्ये आले होते.
यावेळी नागरिकांनी इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी वाढीव ४ चटईक्षेत्र, जमीन मालकीहक्क, इमारत नियमित करणे, सन २००६ चा रेडी रेकनार दर लावणे, भिवंडी आमंत्रण मध्ये ५०० प्लॉट देणे, इमारतीचे वीज व पाणी पुरवठा खंडित न करणे, इमारत दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना ५ लाखाची मदत देणे आदी मागण्या करण्यात आल्या. शहरातील धोकादायक व अवैध इमारतींचा प्रश्न उभा ठाकला असून नागरिकांना विस्थापित होऊ देणार नाही, असे आश्वासन यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी देऊन याबाबत १५ दिवसात जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व संबंधितांना सोबत बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले.
यातून मार्ग काढणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. यावेळी माजी महापौर हरदास माखीजा, पंचम कलानी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती, नगरसेवक मनोज लासी आदी उपस्थित होते. पालकमंत्री व नगरविकास मंत्री यांनी गेल्या आठवड्यात शहरातील अवैध व धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयात बैठक बोलाविली होती. मात्र ऐन वेळी बैठक रद्द केल्याने, शहरवासीयांकडून टीका होत आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड शहरवासीयांना दिलासा देतील. अशी आशा यावेळी बहुतांश नागरिकांनी व्यक्त केली.
आयुक्त दयानिधी बाबत नाराजीकायम महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्या आदेशाने १० वर्ष जुन्या इमारतींना स्ट्रॅक्टरल ऑडिट नोटीसा दिल्याने, शहरवासीयांवर विस्थापित होण्याची वेळ आल्याची टीका नागरिकांनी केली. हजारो नागरिकांवर विस्थापितांची वेळ आणल्याबद्दल अशा आयुक्तांची उचलबांगडी करण्याची मागणी करून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.