ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - बाबरी मशीद खटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल स्वागतार्ह असून केंद्रीय मंत्री उमा भारती, राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांनी नैतिकतेच्या आधारावर आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.
बाबरी मशीद खटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी,मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याणसिंह यांच्यासह 13 जणांवर गुन्हेगारी खटला चालवण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे या प्रकरणी पुढील न्यायालयीन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी सीबीआयने वेगाने पाऊले उचलली पाहिजेत, असे अशोक चव्हाण म्हणाले.
याचबरोबर, सध्या केंद्रात आणि उत्तरप्रदेशात भाजपाचे सरकार सत्तेत असल्याने केंद्रीय मंत्रीपदावर असणा-या उमा भारती मंत्रीपदावर राहिल्या तर त्या खटल्याच्या कामकाजावर प्रभाव पाडू शकतात. त्यामुळे उमा भारती यांनी आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा. तसेच सध्या राज्यपाल या घटनात्मक पदावर असलेले कल्याणसिंह यांच्यावर देखील फौजदारी कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे कल्याणसिंह यांनी पदाचा आधार घेऊन स्वतःचा बचाव करण्यापेक्षा घटनेचा मान राखून आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे असेही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.