कल्याण : केडीएमसी परिक्षेत्रातील घनकचऱ्याचा मुद्दा दिवसागणिक चिघळत चालला आहे. आता उंबर्डेवासीयांनीदेखील कचरा डम्पिंगच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतल्याने घनकचऱ्याच्या भवितव्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.घनकचऱ्याच्या मुद्यावर कार्यवाहीचे आदेश देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या केडीएमसीला फटकारताना उच्च न्यायालयाने नव्या बांधकामांना परवानगी देण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करत नाही तसेच घनकचऱ्याबाबत ठोस कार्यवाही होत नाही, तोपर्यंत नवीन बांधकामे करण्यास परवानगी नाही, असे पुनश्च सुनावण्यात आले आहे. यावर घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उंबर्डे येथे उभारण्याचा निर्णय केडीएमसी प्रशासनाने घेतला आहे. तसेच हा प्रकल्प उभारण्यासाठी लागणारा १८ महिन्यांचा कालावधी पाहता तोपर्यंत मांडा आणि बारावे येथे कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे.दरम्यान, मांडावासीयांनी यास विरोध दर्शविला असताना उंबर्डेवासीयांनी तर आता न्यायालयात धाव घेतली आहे. आधारवाडी येथील डम्पिंग ग्राउंड बंद करून उंबर्डे येथे कचरा डम्प करण्याचा केडीएमसीच्या महासभेने २६ जून २०१३ रोजी केलेला ठराव रद्द करावा, या प्रमुख मागणीबरोबरच कचरा डम्प केल्यास १ लाख ७ हजार नागरिकांना याचा त्रास होणार आहे. उल्हास नदी नजीक असल्याने तीही यामुळे प्रदूषित होईल, तसेच घनकचरा प्रकल्प राबविण्यासंदर्भात महापालिकेचे कोणतेही नियोजन नाही. उंबर्डेआणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर निवासी संकुले आणि इमारती, शाळा उभ्या राहत आहेत. प्रदूषित वातावरणाचा त्यांनाही त्रास होणार असल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
उंबर्डेवासीयांची न्यायालयात धाव
By admin | Published: May 12, 2015 2:02 AM