मुंबई - विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. सगळेच राजकीय पक्ष जोरात कामाला लागले आहे. त्यात या निवडणूकीत महाराष्ट्रात पहिल्यांदाच खासदारकी जिंकणार एमआयएम सुद्धा रिंगणात उतरलं आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेत ही वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्याखाली निवडणूक लढताना एमआयएमनं १०० जागांची मागणी केली आहे. यात औरंगाबादेत,बीड,परभणी आणि नांदेडसह मुस्लिम बहूल भागात एमआयएमनं उमेदवारीची मागणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
औरंगाबाद लोकसभेत विजय मिळवल्यानंतर एमआयएम पक्षाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. आणि त्याचांच पुढचा भाग म्हणून एमआयएमनं राज्यात वंचित बहूजन आघाडीकडे विधानसभेच्या १०० जागांची मागणी केली आहे. त्यासाठी एमआयएनं एक यादीही आंबेडकरांना दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यात औरंगाबादेत,बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर, ठाणे, मुंबईतल्या काही जागा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातही मुस्लिम बहूल भागातील काही मतदारसंघाचा समावेश आहे. तर एकट्या औरंगाबाद जिल्हात ४ जागांची मागणी एमआयएमने केली आहे.
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे विरोधकांचा मोठ नुकसान झाले. खास करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे. वंचितला एकगठ्ठा मुस्लीम आणि दलित मते मिळाल्याने महाआघाडीच्या मतांमध्ये फुट पडली. त्यामुळे मुस्लिम दलित मतं एका ठिकाणी आली तर काय होवू शकते याची प्रचिती मात्र या निवडणूकीत आली, त्यानुसार एमआयएमनं आता मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
तर यावर बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, एमआयएम विधानसभेला १०० जागा लढवणार आहे, अशी चर्चा असली तरी अद्याप तसे ठरलेले नाही. माझी व खासदार असदुद्दीन ओवेसी यांची दिल्लीत बैठक झाली. त्यात उमेदवार जिंकण्याच्या शक्यता हा निकष लावून जागावाटप करायचे ठरले आहे.