ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 20 - स्थापनेनंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आता बदलले आहे. पूर्वीच्या तुलनेत खूप संपन्न झाले आहे. विद्यापीठ दिवसेंदिवस पुढे जात असल्याचे पाहून मला सार्थ अभिमान वाटतो. निर्मितीपासूनच विद्यापीठाला चांगले कुलगुरू लाभले. सर्वांनी विद्यापीठाच्या भरभराटीसाठी अहोरात्र परिश्रम घेतले. प्रगतीचा हा आलेख असाच उंचावत राहिला तर भविष्यात हे विद्यापीठ देशातील पहिल्या ५ क्रमांकांच्या विद्यापीठांमध्ये निश्चित स्थान पटकावेल, असा आत्मविश्वास माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केला.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे उभारण्यात आलेल्या डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी भवन आणि उत्तमविद्या नगरी कर्मचारी वसाहतीचे उद्घाटन सोमवारी सकाळी १० वाजता शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर दीक्षांत सभागृहात झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी मंचावर विशेष अतिथी खासदार रामदास आठवले, विधान परिषद सदस्य प्रकाश गजभिये, आमदार डॉ. सतीश पाटील, नागपूरच्या ‘व्हीएनआयटी’चे संचालक प्रा. एन. एस. चौधरी, कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम, कुलसचिव प्रा. ए. एम. महाजन उपस्थित होते.