ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना-भाजपा दोन्ही पक्ष 114च्या मॅजिक फिगरपासून दूरच आहेत. यामुळे बंडखोर व अपक्ष नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्यासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही पक्षांना बहुमत न मिळाल्याने मुंबई मनपावर सत्ता कोणाची हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारी शिवसेना-भाजपा सत्तेसाठी पुन्हा एकत्र येणार का?, याची चर्चा सध्या राज्यातील राजकारणात सुरू आहे.
मात्र, आपण युतीबाबत अजून कोणत्याही प्रकारे विचार केलेला नाही. सध्या विजयाच्या आनंदात आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मातोश्रीबाहेर येऊन जनतेचे आभार मानताना त्यांनी हे वक्तव्य केले. दरम्यान, दुसरीकडे 'मुंबईत शिवसेना-भाजपाला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही', असे मत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. नितीन गडकरींच्या या भूमिकेमुळे विधानसभेप्रमाणे महापालिकेतही दोन भाऊ मांडीला मांडी लावून बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आणखी बातम्या