सुरेश लोखंडे,ठाणे- जिल्ह्यात ठिकठिकाणी खाजगी जमिनीमध्ये मोबाइल कंपन्यांचे टॉवर्स असून त्यांच्याकडे सुमारे १० वर्षांच्या वाणिज्य अकृषिककराची कोट्यवधींची थकबाकी आहे. ती भरण्यास विरोध करणाऱ्या टॉवर्स कंपन्यांनी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे बैठक झाली. त्यात या करावरील केवळ दंड व फरकाची रक्कम वगळण्यात आली. उर्वरित अकृषिककर हा भरावाच लागणार आहे. ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भार्इंदर परिसरातील २० हजार रहिवासी व व्यापाऱ्यांना अचानक नोटिसा बजावून अकृषिककर भरण्यासाठी मोबाइल टॉवर्सच्या कंपन्यांसह संबंधित जमीनमालकांना जिल्हा प्रशासनाने सक्ती केली आहे. यास विरोध करून स्थानिक लोकप्रतिनिधींनी या नोटिसा मागे घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. अखेर, महसूलमंत्र्यांकडे पार पडलेल्या बैठकीतही फारसे यश मिळाले नसल्याने १० वर्षांचा (२००६-०७) अकृषिककर जिल्ह्यातील व्यापारी, रहिवाशांना भरावाच लागणार आहे. फेबु्रवारीमध्ये बजावलेल्या नोटिसांद्वारे सुमारे १० वर्षांच्या थकीत अकृषिक करवसुलीला महसूलमंत्र्यांनी स्थगिती दिल्याची अफवा ठाणे परिसरात पसरली आहे. यामुळे प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. यासंदर्भात ठाणे प्रांताधिकारी सुदाम परदेशी यांना विचारणा केली असता ‘अकृषिककर भरावाच लागणार आहे. परंतु, त्यावर आकारलेला दंड व फरकाची रक्कम केवळ वगळण्यात आली असून त्यानुसार वसुलीदेखील सुरू असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ठाणे तालुक्यातील एक हजार ५२६ मोबाइल टॉवर्सवाल्यांकडून सुमारे साडेपाच कोटी रुपयांचा अकृषिककर वसूल होणार आहे. यातील काही कर वसूल झाल्याचे सांगितले जात आहे. कर भरण्यास विलंब केल्यास ठाणे, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर या तीन महापालिका क्षेत्रांतील टॉवर्स सील करण्याची कारवाई पुन्हा केली जाणार आहे.
मोबाइल टॉवर्सवरील अकृषिककर वसूल होणार
By admin | Published: April 03, 2017 4:21 AM