ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 23 - वाळू वाहतुकीचा परवाना नसताना सर्रास वाळू वाहतूक करणारी दोन वाहने रविवारी पहाटे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरील वरखेडी पुलावर पकडण्यात आले. दोन्ही वाहने आझादनगर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली. या कारवाईत ट्रक, डंपर व त्यातील वाळू असा मिळून साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त केली असून दोन्ही वाहनांचे चालक-मालक मिळून चौघांविरुद्ध संध्याकाळी उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. तालुक्यातील वरखेडी पुलावर धुळ्याच्या अपर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ट्रक व डंपर अशी दोन वाहने अडवून चालकांकडे परवान्याची मागणी केली. मात्र ते परवाना दाखवू शकले नाहीत. त्या मुळे दोन्ही वाहने जप्त करून आझादनगर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली. या प्रकरणी धुळ्याचे मंडळाधिकारी (सर्कल) विजय पाटील यांनी फिर्याद दिली. त्यानुसार संध्याकाळी उशीरा आझादनगर पोलीस ठाण्यात डंपर चालक राजेंद्र आनंदा सागर, रा.वराडे, ता.देवळा, जि.नाशिक, मालक सचिन रायते या दोघांसह डंपर क्र.एमएच १८ बीए ९३३३ वरील चालक व मालक (नाव, गाव माहिती नाही) अशा एकूण चौघांविरुद्ध म.ज.म. १९६६चे कलम ४८/७, ४८/८ व भादंवि कलम ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक केली नसून तपास पोलीस उपनिरीक्षक उगले करीत आहेत.