मुंबई : औरंगाबादमध्ये विनाअनुदानित शिक्षकांच्या मोर्चावर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ राज्यात बंदची हाक देण्यात आली आहे. विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्यांना पाठिंबा देणाऱ्या अनुदानित शाळांतील शिक्षकांनी मात्र बंदमध्ये सामील होणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. तसेच शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार आहेत.अनुदानित शाळांनी बंदमध्ये सहभाग घेतला नसल्याने या बंदचा परिणाम मुंबईत दिसणार नाही. राज्यातील ग्रामीण भागातील शाळा मोठ्या संख्येने बंद राहण्याची शक्यता आहे. शिक्षक परिषद, शिक्षक भारती, काँग्रेस शिक्षक सेल या सर्वच संघटनांनी विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे. शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे म्हणाले की, पोलिसांनी शिक्षकांवर केलेल्या लाठीहल्ल्याचा परिषदेने निषेध केला आहे. विनाअट अनुदानाचे वितरण करून शिक्षकांचे प्रत्यक्ष वेतन सुरू करावे. महाराष्ट्र राज्य शिक्षण हक्क कृती समिती आणि शिक्षक भारतीने गुरुवारी, ६ आॅक्टोबर रोजी परळ येथे सायंकाळी ४ वाजता बैठकीचे आयोजन केले आहे. शिवाय सर्व शिक्षक संघटनांची बैठक शुक्रवारी पुण्यामध्ये होणार आहे. या वेळी लाठीहल्ल्यावर चर्चा करून ठोस निर्णय घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
आज विनाअनुदानित शाळांचा बंद!
By admin | Published: October 06, 2016 4:49 AM