मुंबई : विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव उद्या (सोमवारी) चर्चेला येत असून, या प्रस्तावाला पाठिंबा देण्याचे संकेत भाजपाने दिले आहेत. या ठरावाला काँग्रेसबरोबरच शिवसेनेकडून विरोध केला जाण्याची शक्यता आहे. सभापतींविरोधातील हा अविश्वास प्रस्ताव भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोस्ती अधिक घट्ट करणारा तर भाजपा-शिवसेना यांच्यातील दुरावा वाढवणारा ठरण्याची शक्यता आहे.मागील आठवड्यात राष्ट्रवादीचे २३ व शेकापचा १ अशा २४ सदस्यांनी हा अविश्वास प्रस्ताव स्वीकारण्याकरिता सभागृहात उभे राहून मागणी केली. नियमानुसार पुढील ७ दिवसांत हा प्रस्ताव चर्चेला घेणे आवश्यक आहे. कामकाज पत्रिकेवर सोमवारच्या कामकाजात प्रश्नोत्तराखेरीज केवळ या अविश्वास प्रस्तावावरील चर्चा हेच कामकाज दाखवले आहे. प्रस्ताव मंजूर होण्याकरिता राष्ट्रवादी व शेकाप यांच्या २९ सदस्यांखेरीज भाजपाच्या १२ मतांची गरज आहे. काँग्रेसचे २१, शिवसेनेचे ७, रिपाइं (कवाडे गट) व लोकभारतीचे प्रत्येकी एक असे ३० सदस्य अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात मते टाकतील, असे चित्र आहे. (विशेष प्रतिनिधी)
सभापतींवर अविश्वास; दुरावा वाढण्याची चिन्हे
By admin | Published: March 16, 2015 3:38 AM