मुंबई : विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावाचा तिढा सोडवण्याकरिता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यात चर्चा सुरु असून त्यातून सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्वास राधाकृष्ण विखे-पाटील व धनंजय मुंडे या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमधील विरोधी पक्षनेत्यांनी व्यक्त केला. दोन्ही पक्षांमधील समन्वयावर याचा कुठलाही परिणाम होणार नाही, असा दावा त्यांनी केला.विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपा-शिवसेना सरकारला घेरण्याची रणनिती काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते निश्चित करीत आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूर येथील अधिवेशनात सभापतींविरुद्ध दाखल अविश्वास प्रस्तावाबाबत विचारले असता याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु असल्याचे विखे व मुंडे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अविश्वास प्रस्ताव मागे घेण्यास नकार दिल्याकडे लक्ष वेधले असता चर्चेतून नक्की सकारात्मक मार्ग निघेल, असा विश्वास विखे-पाटील यांनी व्यक्त केला. विधानसभेत काँग्रेसचे बहुमत असतानाही राष्ट्रवादीकडे अध्यक्षपद सोपवले होते. त्यामुळे आता विधान परिषदेत राष्ट्रवादीचे संख्याबळ अधिक असल्याने त्यांनी सभापतीपदावर दावा करु नये, असे काँग्रेसचे मत आहे तर बहुमताच्या आधारे विधान परिषदेतील सभापती व विरोधी पक्षनेतेपद ही दोन्ही पदे मिळावी, असे राष्ट्रवादीचे मत आहे. दोन्ही कॉँग्रेस मधील सुंदोपसुदी आता राज्यात लपली नसल्याने या प्रयत्नांकडे जनतेचे ही लक्ष लागले आहे. (विशेष प्रतिनिधी)
अविश्वासाचा तिढा सुटेल, काँग्रेस-राष्ट्रवादी आशावादी
By admin | Published: March 09, 2015 1:48 AM