ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. ५ - आरक्षणाच्या मुद्यावरून सध्या सर्वत्र अस्वस्थतता आहे. त्यामुळे प्रत्येक समाजाच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्याची खबरदारी शासनाने घेतली, तरी ती अस्वस्थता दूर होईल, असे मला वाटते, असे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवार यांनी रविवारी खासदार सुप्रियाताई सुळे, सदानंद सुळे यांच्यासह विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, मंदिर समितीचे माजी अध्यक्ष आण्णासाहेब डांगे, जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली, व्यवस्थापक विलास महाजन उपस्थित होते. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने शरद पवार यांचा संजय तेली यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
गेली ६० वर्षे मराठा समाजाच्या नेत्यांच्या हातात सत्ता असली तरी त्यांनी जातीची सत्ता अशा पद्धतीने कधी बघितली नसल्याचे सांगून शरद पवार म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते आजपर्यंत सत्ता सांभाळताना आमचा व्यापक दृष्टीकोन होता. तो आजही आहे़ मात्र असे असताना कोणत्याही घटकाचे एखादे दुखणे असेल तर ते दुर्लक्षित करून चालणार नसल्याचे सांगत पूर्वी अशा घटकांकडे दुर्लक्ष झाल्याची कबुली त्यांनी दिली़
आरक्षणाची आजही तेवढीच गरज असल्याची ठाम भूमिका घेताना मराठा, धनगर, जाट, पटेल अशा विविध आरक्षण मागणाºया समाजाचे मूलभूत प्रश्न सोडविल्यास हा असंतोष कमी होईल, त्यामुळे त्यात अधिक लक्ष घालण्याची गरज आहे़ त्यामुळे राज्य व केंद्र शासनाने एकत्र बसून विचार करावा, असे शरद पवार यांनी सांगितले़
आपण गेली ५० वर्षे सार्वजनिक राजकारणात असून परिवर्तनाच्या प्रश्नावर कधी कोणतीच तडजोड केली नाही़ नामांतर असो, ओबीसी व इतर प्रश्न असो त्यासाठी वेळोवेळी त्याची किंमत मोजली आहे़ असे असले तरी आमची विचारधारा कधी सोडली नाही. असे असताना मला असा प्रश्न विचारायचा कितपत अधिकार त्यांना आहे, असा सवाल करीत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. शिवसेना राज्यातील सत्ताधारी पक्षाचा घटक असल्याने अॅट्रॉसिटीसाठी विशेष अधिवेशन बोलावयाचा त्यांचा विचार दिसतोय, असे पवार यांनी सांगितले़
मंदिर सुधारणाचा घेतला आढावा
शरद पवार यांनी विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरात चालू असलेल्या सुधारणाचा आढावा घेतला. तसेच मंदिर समितीमार्फत भाविकांसाठी जे भक्त निवास बांधण्यात येत आहे त्याची माहिती दिली असता भक्तनिवासाचे दर हे सामान्य भाविकांना परवडतील असे असावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिवाय मंदिर समिती कर्मचा-यांना मिळणारे वेतन कमी आहे़ याबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, असे संजय तेली यांना शरद पवार सांगितले.