मुंबई : राज्यातील शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी बिनपैशांचा उपाय महसूल विभागाने शोधून काढला आहे. शेतकऱ्यांना आत्महत्यांपासून परावृत्त करण्यासाठी आता शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या समुपदेशन समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे. शासकीय यंत्रणा आणि शेतकरी यांच्यात संवाद साधण्यासाठी या समित्यांची स्थापना करण्यात येत आहे. आत्महत्याग्रस्त वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने अलीकडेच महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेऊन अशा समित्या स्थापन करण्याची मागणी केली होती.खडसे यांनी सांगितले की, आत्महत्याग्रस्त भागात तंटामुक्ती समितीच्या धर्तीवर समुपदेशन व उपाययोजना समित्यांची स्थापना करण्यात येईल. प्रत्येक समितीत सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष वा पंचायत समिती सदस्यांचा समावेश असेल. या समितीच्या माध्यमातून गावोगावी मेळावे घेण्यात येतील. शासकीय योजनांची माहिती दिली जाईल. (विशेष प्रतिनिधी)
शेतकरी आत्महत्यांवर बिनपैशाचा उपाय !
By admin | Published: April 04, 2015 4:20 AM