अमरावती : केंद्र सरकारने परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना १ मे २०१८ पासून एमसीआयची पात्रता प्रमाणपत्र परीक्षा (नीट) अनिवार्य केली आहे. त्यामुळे अमेरिका, जर्मनी व फिलिपाइन्समध्ये एमबीबीएसला प्रवेशित विद्यार्थ्यांना भारतात येऊन पुन्हा नीट परीक्षा द्यावी लागणार असून, याकरिता मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर व्हावा, यासाठी शेकडो पालकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले आहे.मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया (एमसीआय)े ने परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी ६ मे २०१८ रोजी नीट परीक्षा घेण्याचे ठरविले आहे. या बाबीचा फटका सन २०१७ मध्ये परदेशात एमबीबीएसला प्रवेशित विद्यार्थ्यांना बसणार आहे. विशेषत: अमेरिका, जर्मनी व फिलिपाइन्स या देशांमध्ये पहिल्या वर्षाचे प्रवेश प्री-मेडिकल कोर्स गणले जात असल्याने याचा मूळ कालावधी आॅगस्ट २०१८ मध्ये संपुष्टात येणार आहे. तत्पूर्वी एमसीआयने ६ मे रोजी नीट परीक्षा घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे सन २०१७ मध्ये नीट परीक्षा उत्तीर्ण करून परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळविलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना देशात परत येऊन पुन्हा परीक्षा द्यावी लागेल. फिलिपाइन्स, अमेरिका व जर्मनी येथे बीएस, एमडी या पाच वर्षीय वैद्यकीय शिक्षणाला भारतात एमबीबीएस म्हणून मान्यता दिली, तर रशिया, चीन व अन्य देशात एमबीबीएस/एमडीला एमबीबीएस म्हणून मान्यता प्रदान करण्यात आली आहे. मात्र, रशिया, चीनमध्ये वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना नीट परीक्षेतून सूट मिळाली, हे विशेष.रशिया, चीन व अन्य देशात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा असल्यास बारावी विज्ञान (पीसीबी) मध्ये ५० टक्के गुण मिळवून एमसीआयचे पात्रता प्रमाणपत्र दिले जाते. परंतु, फिलिपाइन्स, अमेरिका व जर्मनीमध्ये एमबीबीएस शिक्षणासाठी जाणाºया विद्यार्थ्यांना पीसीबी ग्रुप घेऊनदेखील सन २०१७ मध्ये नीट ब्रेक देऊनही पात्रता प्रमाणपत्र दिलेले नाही. येथे बीएस शिक्षण पूर्ण झाल्यावर एमडी प्रवेश घेतेवेळी एमसीआयचे प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे आता फिलिपाइन्स येथे गेलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्यामुळे भारत सरकारने परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना नीटमध्ये सूट देऊन होणारा अन्याय दूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.खासदार अडसुळांचे पंतप्रधानांना पत्रभारतातून फिलिपाइन्समध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी सन-२०१७ मध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांना एमसीआयच्या नीट परीक्षेतून सूट द्यावी, याबाबतचे पत्र अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २६ फेब्रुवारी रोजी दिले. एमसीआयच्या नवीन नियमावलीचा फटका परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना बसत असून, प्रवेशासाठी अगोदरच पालकांचा बराच खर्च झाल्याचेही नमूद आहे.परदेशात वैद्यकीय उच्च शिक्षणाला अगोरदच नीट परीक्षा देऊनच प्रवेश मिळविला. मात्र, एमसीआयने पुन्हा नीट परीक्षा घेण्याचे निश्चित केल्याने याचा फटका परदेशात गेलेल्या विद्यार्थ्याना बसणार आहे. खासदार अडसुळांमार्फत पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन व्यथा मांडू. अरुणा संजय चौधरी, पालक, अमरावती.
परदेशातील भारतीय विद्यार्थ्यांवर अन्याय, वैद्यकीय शिक्षणासाठी पुन्हा ‘नीट’ची अट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 4:55 PM