कोल्हापूर : देशात मजबूत सरकार असतानाही समाजातील सर्वच घटकांतील अस्वस्थता चिंताजनक आहे. आगामी काळात देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी विरोधक आणि सत्ताधारी यांनी सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री, राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केले. सुसंवादातून चांगले संबंध निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाकिस्तान भेट बरोबरच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंगच्या आवारात आयोजित कार्यक्रमात ‘सध्याची राजकीय परिस्थिती आणि माध्यमांची भूमिका’ या विषयावर खासदार पवार बोलत होते. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज अध्यक्षस्थानी होते. महापौर अश्विनी रामाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.खासदार पवार म्हणाले, शेती उत्पादनाचे भाव पडल्याने क्रयशक्ती कमी झाली आहे. त्याचे परिणाम उद्योग, व्यापार यांच्यावर होत आहेत. विकासाचा दर खालावला आहे. गुंतवणूक घटली आहे. त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. वीज, पाणी, रस्ते, आदी सुविधांच्या दृष्टीने ठोस पावले उचलूी जात नाहीत, असे एका बाजूला चित्र असताना दुसऱ्या बाजूला शेजारच्या देशातील काही घातक प्रवृत्ती डोके वर काढत आहेत, हल्ले करीत आहेत. पठाणकोट हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. हे चित्र बदलण्यासाठी विरोधकांनी विरोधाला विरोध आणि सत्ताधाऱ्यांनी एकतर्फी निर्णय पद्धती टाळून सामंजस्याने देशहिताचा निर्णय घेणे आवश्यक आहे.देशाची आर्थिक व्यवस्था मजबूत करण्यासाठी जीएसटी करप्रणाली मी मंत्रिमंडळात असताना तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आणली. त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेले आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिला विरोध केला. आता मोदी पंतप्रधान आहेत. ते जीएसटी करप्रणालीचे बिल आणत आहेत. सत्तेत असताना बिल मांडलेली आणि विरोधात असलेली काँग्रेस आता विरोध करीत आहे, हे चुकीचे आहे. देश महासत्ता होण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी चर्चेतून निर्णय घ्यायला हवेत. पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी संवाद सुरू असताना नुकतेच संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर हे शेजारील देशातील कारवायांना उद्देशून ‘आता सहनशीलता संपली आहे’ असे म्हणत आहेत, हे गंभीर आहे. मी संरक्षणमंत्री असताना आणि जागतिक क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष असताना मला अनेक देश फिरण्याची संधी मिळाली. मी पाकिस्तानचाही दौरा केला. परवानगी नाकारली असतानाही मी त्यावेळचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे आग्रह करून भारतीय संघ पाकिस्तानात नेला. तेथे पाकिस्तान आणि भारत यामध्ये एकदिवसीय सामना झाला. तेथे भारतीय खेळाडूंना मिळणारा प्रतिसाद पाहून हा सामना मुंबईत होत असल्याचा मला प्रत्यय आला. त्यामुळे पाकिस्तानातील सर्वचजण भारतद्वेषी आहेत, असे समजणे हे चुकीचे आहे. काही घटक विघातक आहेत. त्यांचा निष्पापांवर विपरीत परिणाम होत आहे. यावेळी प्रेस क्लबला जागा हस्तांतर करण्याचे पत्र अध्यक्ष विकास कांबळे यांच्याकडे देण्यात आले. पुरस्कारप्राप्त राजाराम लोंढे (लोकमत), छायाचित्रकार शशिकांत मोरे (तरुण भारत), रणजित माजगावकर (एबीपी माझा) यांचा खासदार पवार यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार निवेदिता माने, आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, उपमहापौर शमा मुल्ला, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, ए. वाय. पाटील, व्ही. बी. पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, आदी उपस्थित होते. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. अध्यक्ष विकास कांबळे यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष सतीश घाटगे यांनी आभार मानले.टोला : भाजपबरोबर जुळलं...देशपातळीवर आमचा पक्ष लहान आहे. विरोधासाठी विरोध आम्ही कधी केला नाही, करणार नाही. देशहिताच्या निर्णयासाठी मित्र असलेल्या काँग्रेसलाही सत्ताधारी भाजपला मदत करण्यास विनंती करू. असे करताना ‘आमचं आणि भाजपचं जुळलं आहे,’ असा माध्यमांनी अर्थ काढू नये, असा टोला पवार यांनी लगावताच हशा पिकला.सबनीसांनी म्हटले... मी म्हणणार नाही..साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी सबनीस यांनी ‘पत्रकारिता ही चौथा खांब नसून कसली तरी काठी आहे,’ असे म्हटले. त्या कार्यक्रमाला मीही होतो. मात्र, काठी वगैरे काही मी म्हणणार नाही. पत्रकारिता ही चौथा खांबच आहे. समाजहितासाठी या चौथ्या खांबाने कार्यरत राहावे, असा सल्लाही पवार यांनी दिला.
मजबूत सरकार असूनही अस्वस्थता
By admin | Published: January 18, 2016 12:56 AM