मुंबई : विविध प्रलंबित मागण्यांसाठी ६ सप्टेंबर रोजी राज्यभरातील विनाअनुदानित शाळांतील शिक्षक अनवाणी अध्यापनाद्वारे निषेध आंदोलन करणार आहेत. तसेच ५ सप्टेंबरला दिल्लीत आॅल इंडिया फेडरेनशन आॅफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशनने (एआयफुक्टो) ‘जेल भरो’ आंदोलनाची हाक दिली आहे.राज्यातील विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. सरकारने फक्त १ हजार ६२८ शाळांना २० टक्के अनुदान दिले आहे. त्यामुळे यंदाचा शिक्षक दिन राज्यभरातील विनाअनुदानित शिक्षक ‘आत्मक्लेष दिन’ म्हणून पाळणार आहेत. तसेच ते ६ सप्टेंबरला अनवाणी अध्यापन करणार असल्याची माहिती, महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी दिली. एआयफुक्टोनेही ५ सप्टेंबरला दिल्लीतील जंतरमंतर येथे ‘जेल भरो’ आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबई विद्यापीठासह राज्यातील, इतर विद्यापीठांतील प्राध्यापक त्यांच्या विविध मागण्यांसाठी यात सहभागी होणार असल्याची माहिती असोसिएशनने दिली.
विविध प्रलंबित मागण्यांसाठी विनाअनुदानित शिक्षक करणार अनवाणी अध्यापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 3:29 AM