सुरेश भटेवरा / नवी दिल्ली दिल्लीच्या प्रगती मैदानावर सोमवारपासून १५ दिवस चालणाऱ्या ३६ व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्राचे दालन अगदीच फिके ठरले. डिजिटल महाराष्ट्राची संकल्पना केंद्रस्थानी ठेवून सजावट केलेल्या दालनात ना कोणतीही कल्पकता आहे ना कौशल्य. महाराष्ट्राच्या औद्योगिक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीचे तद्दन निरस दर्शन त्यातून घडावे, अशी स्थिती आहे. अन्य राज्यांच्या लक्षवेधी स्टॉल्सकडे नजर टाकली, तर महाराष्ट्र मागासलेले राज्य असावे, असा भास राष्ट्रीय आंतराष्ट्रीय पर्यटकांना व्हावा, इतक्या बेपर्वा पद्धतीने महाराष्ट्राचे पॅव्हेलियन कसेबसे सजवण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन होणार होते. तशा पत्रिकाही वाटल्या होत्या, पण ते आलेच नाहीत. अखेर उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते तब्बल तासभर उशिरा उद्घाटन उरकले गेले.महाराष्ट्राच्या विकासाचे व प्रगतीचे दर्शन जगाला घडवण्याची जबाबदारी राज्याचे लघु उद्योग महामंडळ, उद्योग विभागाचे विकास आयुक्त व दिल्लीस्थित महाराष्ट्राच्या विशेष आयुक्तांकडे असते. महाराष्ट्राचे दालन योग्य प्रकारे सजवले जात आहे की नाही, यात यापैकी कोणीच बहुदा रस घेतला नसावा. प्रवेशद्वारावर मेघडंबरीसह शिवाजी महाराजांचा पुतळा, टिटवाळ्याच्या सिद्धिविनायकाची मूर्ती व घारापुरी लेण्यांची प्रतिकृती. राज्याच्या विकासाची एक चित्रफित लोकांना दिसते. आत शिरताच महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळाने छापलेल्या चकचकीत पत्रकाच्या मलपृष्ठावर मेक इन इंडियाचा सिंह तेवढा आहे. मात्र, प्रगतीच्या आकडेवारीचे बहुतेक तक्ते मे २0१४ पर्यंतचेच आहेत.
राज्याच्या प्रगतीच्या दर्शनाची जगासमोर बेपर्वाई
By admin | Published: November 15, 2016 1:57 AM