वैभव बाबरेकर, अमरावतीतापावर रामबाण उपचार म्हणून वर्षानुवर्षे ‘पॅरासिटामॉल’ औषधाचा वापर केला जातो. तथापि, लहान मुलांना देण्यात येणाऱ्या पॅरासिटामॉलच्या अप्रमाणित साठ्याचा पुरवठा केल्याप्रकरणी हिमाचल प्रदेशातील कंपनीविरुद्ध अमरावतीत खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात कंपनीने राज्य शासनाचीच फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होते.हिमाचलच्या सोलन जिल्ह्यातील ‘मॅगब्रो हेल्थ केअर प्रा. लि.’ या कंपनीने राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमध्ये अप्रमाणित औषधे पुरविल्याचे औषध प्रशासन विभागाने केलेल्या तपासणीत उघड झाले आहे. रीतसर निविदा काढून राज्य शासनाने औषध पुरवठ्याचे कंत्राट या कंपनीला दिले आहे. कंपनीने पॅरासिटामॉल ओरल सस्पेंशन लिक्विडच्या (तोंडावाटे देता येणारी द्रवरुपी औषधी) ६० मि.ली. बॉटल्सचा पुरवठा राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा सामान्य रुग्णालयांना केला.राज्य शासनासोबत कंपनीचा करार झाल्यानंतर राज्यातील विविध जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा सामान्य रुग्णालयांना पॅरासिटामॉल औषधाचा पुरवठा करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यातील अनेक ठिकाणी या औषधांची तपासणी केली असता, तेथेही हे औषध अप्रमाणित असल्याचे आढळून आले आहे. राज्यातील सांगली, सातारा, यवतमाळ, अकोला, बुलडाणा यांसह अनेक जिल्ह्यांत अप्रमाणित औषधींचा पुरवठा झाल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अमरावतीच्या एफडीएचे सहायक आयुक्त (औषधे) पी. एन. शेंडे यांच्या मार्गदर्शनात औषध निरीक्षक पी.एम. बल्लाळ यांच्या पथकाने नियमित कार्याचा भाग म्हणून अमरावतीतील काही शासकीय रुग्णालयांतील पॅरासिटामॉल औषधाचे नमुने घेतले. कंपनीद्वारे पुरविण्यात आलेल्या एमजीएल १०९, १७१, १७३, १७२, ११०, १०८ या बॅच क्रमांकाच्या औषधांची मुंबई व औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. या अहवालात ही औषधे अप्रमाणित असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.या शिवाय विविध समूहांच्या अप्रमाणित औषधांचा पुरवठा महाराष्ट्र शासनाला केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सखोल तपासकार्य करून पुरावे गोळा केले. त्यानंतर अप्रमाणित औषध उत्पादन व विक्रीबाबत कायद्यानुसार ११ जणांविरुद्ध अमरावती येथील न्यायालयात ७ आॅक्टोबर २०१५ रोजी खटला दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)> एफडीएने गतवर्षी नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत अमरावतीच्या शासकीय रुग्णालयातील पॅरासिटामॉल औषधाची प्रयोगशाळेमध्ये तपासणी केली असता, ती अप्रमाणित असल्याचे आढळून आले. त्यामुळे एफडीएने सर्व शासकीय रुग्णालयांतील सात लाखांचा साठा जप्त केला आहे. >प्रयोगशाळेने दिलेला अहवालमुंबई व औरंगाबाद येथील प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार, हे औषध गुलाबी रंगाऐवजी गडद गुलाबी (कथ्या) रंगाचे असल्याचे स्पष्ट झाले. काही नमुन्यांमध्ये बारीक काळे कण (ब्लॅक पार्टीकल) आढळले, तर काही औषधांना दुर्गंधी होती.>अप्रमाणित औषधांचा पुरवठा केल्याप्रकरणी हिमाचल प्रदेशातील कंपनीविरोधात अमरावती न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. अमरावतीसह अन्य जिल्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणात अप्रमाणित औषधांचा पुरवठा झाल्याचे आढळून आले आहे. - पी. एन. शेंडे, सहायक आयुक्त (औषधे),अन्न व प्रशासन विभाग
अप्रमाणित ‘पॅरासिटामॉल’
By admin | Published: October 17, 2015 3:01 AM