लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वाढत्या उन्हाच्या काहिलीसह घाम फोडणाऱ्या उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईत शुक्रवारी रात्री पावसाने हजेरी लावली. ठाण्यासह नवी मुंबईतील बहुतांश परिसरांत पावसाच्या हजेरीमुळे काही काळासाठी आल्हाददायक वातावरण निर्माण झाले. सांगली जिल्ह्यात वीज पडून दोन शेतमजूर ठार झाले. पनवेलमध्ये शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. धुळ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. शहरातील अग्रवाल नगर, पांझरा नदी किनाऱ्यावरील चौपाटी परिसरात वृक्ष उन्मळून पडले. कोल्हापूर शहरात हलक्या सरी पडल्या. रत्नागिरी जिल्ह्यात संध्याकाळी पावसाने हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्गला वादळाचा तडाखा बसला. घोटगे-परमे पंचक्रोशीत हजारो केळीची झाडे जमीनदोस्त झाली. वडगाव (जि. सांगली) येथे साडेचारच्या सुमारास वीज पडून शंकर कोंडी पाटील (६०) आणि अरविंंद राजाराम बिसले (४५) हे शेतमजूर ठार झाले. बीडमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वळवाच्या पावसाने हजेरी लावली. हिंगोली जिल्ह्यातील विविध भागांत विजांसह पाऊस पडला. पावसाचा अंदाज-१३ मे : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहील.१४ आणि १५ मे : दक्षिण कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहील.१६ मे : मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहील.इशारा-१३ मे : मध्य महाराष्ट्रात ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा १५ आणि १६ मे : पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यतामुंबई : शनिवारसह रविवारी कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २६ अंशांच्या आसपास राहील. आकाश अंशत: ढगाळ राहील.
अवचित बरसले मेघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2017 2:44 AM