महाराष्ट्रात दोन समाज एकमेकांसमोर उभे ठाकलेत असे होऊ देऊ नका. कोणत्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असा मी शब्द देतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
छत्रपती संभाजीराजेंनी छगन भुजबळांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केल्याचे पत्रकारांनी विचारले असता फडणवीस यांनी यावर बोलणार नाही असे सांगितले. मी कोणाचेही भाषण ऐकलेले नाहीय. मी प्रवासात होतो. यामुळे मी कोण काय बोलले यावर बोलणार नाही, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.
भुजबळ काय म्हणालेले...अंतरवाली सराटी इथं झालेल्या लाठीचार्जमध्ये एकच बाजू समोर येते, परंतु पोलिसांवरील हल्ल्याची दुसरी बाजू कुणी पाहिली नाही. राज्य आणि देशाच्या पुढे खरे चित्र न येता पोलिसांना दोष देण्यात आला, असा आरोप भुजबळांनी केला आहे. उपोषण सुरु असतांना पोलिसांनी विनंती केली. त्यांची विनंती समजून न घेता त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. यामध्ये ७० हून अधिक पोलीस जखमी झाले. मात्र एकच बाजू सगळीकडे दाखविण्यात आली. ते पोलीस काय पाय घसरून पडले काय ? असा सवाल केला. तसेच मनोज जरांगे पाटलांवरही वैयक्तीक टीका केली आहे. यावरून भुजबळ यांच्यावर आता टीका होऊ लागली आहे.
जरांगेंचे प्रत्यूत्तर...लोकांचे खाल्ल्याने ते आतमध्ये जाऊन आले आहेत. कोण कुणाचे खात आहे सर्वांना माहित आहे. त्यामुळे त्यांनी यावर बोलू नाहीत. तुम्ही टीका केली तर, तुम्हाला उत्तर देण्यासाठी आम्ही कच्चे नाहीत. या राज्यात आम्ही वातावरण खराब होऊ देणार नाही. आता आम्ही देखील 50 टक्के आहे. लोकांचे पैसे खाता, रक्त पिता का? मग तुम्हाला कोण देव मानणार आहे. वयाने तुम्ही मोठे आहेत. आम्हाला काढायला लावू नयेत. आम्ही देखील तुमचा बायोडेटा काढला आहे. धमक्या देऊ नयेत, असे जरांगे म्हणाले.