पुणे : स्मार्ट सिटी योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन या स्पेशल पर्पज व्हेईकलच्या (एसपीव्ही) माध्यमातून शहरात ५१ प्रकल्पांची उभारणी होणार आहे. त्यातील १५ प्रकल्प येत्या ३ महिन्यांत सुरू करण्याचा निर्णय एसपीव्ही संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीत घेण्यात आला.पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या दहा संचालकांची बैठक सोमवारी महापालिकेमध्ये झाली. या बैठकीला महापालिकेचे आयुक्त व कंपनीचे अध्यक्ष कुणाल कुमार, महापौर दत्तात्रय धनकवडे, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, सभागृह नेते बंडू केमसे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, नगररचना सहसंचालक प्रकाश भुक्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार उपस्थित होते. एसपीव्हीची ही पहिलीच बैठक असल्याने अध्यक्षांची निवड, बँकेतील खाते, सीईओंची नेमणूक, आॅडिट यावर निर्णय घेण्यात आले. त्याचबरोबर स्मार्ट सिटी प्रकल्पांची वेगाने उभारणी करण्याचा या वेळी निर्णय घेण्यात आल्याची माहिती कुणाल कुमार यांनी दिली.कुणाल कुमार यांनी सांगितले, ‘‘स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत ५१ प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यातील लगेच सुरू करता येतील अशा १५ प्रकल्पांचे कामांची टेंडरप्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये स्मार्ट सिटीचा मॉडेल एरिया म्हणून निवड केलेल्या भागात वॉकिंग प्लाझा उभारणे, पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे सुकर व्हावे म्हणून हॅपी स्ट्रिट प्रकल्प उभारणे, नागरी सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे आदी कामे सुरू केली जाणार आहे. त्याचबरोबर बसना जीपीएस सिस्टिम बसविणे, मोबाईल अॅपवर बसची माहिती उपलब्ध करून देणे आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.’’आयुक्त, महापौर व विभागीय आयुक्त या तिघांच्या मान्यतेने कंपनीची स्थापना करण्यात आली होती. आज इतर संचालकांची नियुक्ती करण्यात आली. केंद्राच्या निर्देशानुसार आयुक्तांची कंपनीच्या अध्यक्षपदी निवड करण्यास औपचारिक मान्यता देण्यात आली. कंपनीचे ३ लोगो तयार करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर कंपनी स्थापनेचा खर्च, शेअर्स अॅलॉटमेंट याबाबत निर्णय घेण्यात आले. कंपनीचा पत्रव्यवहार, इतर प्रस्ताव तयार करण्याचे अधिकार अध्यक्षांना देण्यात आले. कंपनीचा कारभार सध्या पालिकेतूनच चालणार असून, कंपनीसाठी स्वतंत्र जागेचा शोध घेतला जात आहे. कंपनीची पुढील बैठक ३० एप्रिलला सकाळी ११ वाजता महापालिकेमध्ये होणार आहे.
स्मार्ट सिटीअंतर्गत ५१ प्रकल्प उभारणार
By admin | Published: April 19, 2016 1:31 AM