ऑनलाइन लोकमतभिवंडी दि. 25- आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने काल रात्री भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील तीन पूल पाण्याखाली गेले आहे. मुसळधार पावसानं किमान 20 ते 22 गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे. काल मध्यरात्रीपासून ठाण्यासह भिवंडीत जोरदार पाऊससरी कोसळल्या. भिवंडी तालुक्यात 24 तासांत सर्वाधिक 205 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातल्या गावातील छोटे-मोठे प्रवाह जवळच्या नदीला मिसळून पाण्याचा लोंढा आला आणि वाडा तसेच वसई परिसराला जोडणारे तीन पूल पाण्याखाली गेले. त्यामुळे अवचितपाडा, निंबवली, गोराड, कलभोण आणि गणेशपुरी यांच्यासह छोट्या-मोठ्या 20 गावांचा संपर्क तुटला. या पावसाने शेतकरी सुखावले असले तरी जनजीवन विस्कळीत झालं आहे. तीन पूल पाण्याखाली गेल्यानं वाडा आणि वसईच्या बाजारात दूध, भाजीपाला विक्रीसाठी आणणारे शेतकरी गावातच अडकून पडले. मुसळधार पावसामुळे ते शहरापर्यंत पोहोचू शकले नाहीत. मुसळधार पावसानं संपर्क तुटलेल्या गावांपर्यंत महसूल विभागाचे अधिकारी देखील आज संध्याकाळपर्यंत पोहोचू शकलेले नव्हते,अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
भिवंडीतील तीन पूल पाण्याखाली, 20 ते 22 गावांचा संपर्क तुटला
By admin | Published: June 25, 2017 9:20 PM