कल्याण : कल्याण-डोंबिवलीत सध्या पावसाळापूर्व देखभालीची कामे सुरू आहेत. मात्र, अन्य कामे करत असतानाच भुयारी गटारांवरील झाकणे गायब झाल्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या उघड्या गटारांत पडून एखाद्याला मृत्यू येऊ शकतो. प्रसंगी त्याला कायमचे अपंगत्व येऊ शकते. स्मार्ट सिटीचा नव्याने प्रस्ताव तयार करण्याची लगबग महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे. त्यात अशा छोटछोट्या नागरी समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. स्मार्ट सिटी अशी असणार का, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.महापालिकेने भुयारी गटारे बांधली आहेत. अनेक भुयारी गटारे ही पदपथांवर आहे. त्यांच्यावरील झाकणे गायब आहेत. जल आणि मलनि:सारण विभाग आणि बांधकाम विभागाने हे पाहणे गरजेचे आहे. मात्र, या दोन्ही विभागांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक ठिकाणी ही झाकणे लोखंडी आहेत, तर काही ठिकाणी सिमेंटची. काही ठिकाणी फायबरची झाकणे लावली आहेत. लोखंडी झाकणे ही गटारातील वायू व दुर्गंधीमुळे गंजतात. त्यामुळे ती खिळखिळी होतात. फायबरची झाकणे रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांच्या वजनामुळे दबली जातात. सिमेंटची झाकणे गटारे स्वच्छ करणाऱ्यांकडून लवकर उघडली जात नाही. अनेकदा गटारे स्वच्छ करण्यासाठी उघडलेले झाकण पुन्हा लावले जात नाही. लोखंडी व फायबरची झाकणे शहरातील गर्दुल्ले, चोरांकडून चोरी केली जातात. सिमेंटची झाकणे चोरी होत नसली तरी झोपडपट्टी भागातील लोक ती काढून त्यांच्या घराशेजारी गटारीवर टाकतात. या सगळ्या प्रकारांकडे प्रशासनाची डोळेझाक होते. त्याचा त्रास पादचाऱ्यांना सहन करावा लागतो.एप्रिल २०१५ मध्ये कल्याण पश्चिमेतील अहिल्याबाई चौकातील पथपदावरील झाकण नसलेल्या उघड्या गटारात पडून ७५ वर्षीय लोकीबाई सांगळे या जखमी झाल्या होत्या. त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. या घटनेची गंभीर दखल तत्कालीन प्रभारी आयुक्त श्यामसुंदर पाटील यांनी घेतली होती. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईचे आदेश दिले होते. दिलीप लोंढे हे १३ मार्च २०१४ रोजी बेतूरकरपाडा येथे गटारात पडले होते. त्या गटाराला झाकण नव्हते. या घटनेत त्यांचा पाय व डोक्याला गंभीर दुखापतझाल्याने त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार केला होता. त्यांचे २६ हजार रुग्णालयाचे बिल झाले होते. त्यावेळी आयुक्त शंकर भिसे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई केली होती.येत्या १७ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कल्याण-डोंबिवली महापालिकेने आयोजित केलेल्या स्मार्ट सिटी शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. नागरिकांना काय विकास अपेक्षित आहे, त्यांच्या समस्या काय आहेत, हे त्यात खऱ्या अर्थाने जाणून घेतले जाणार आहे की नाही, हा प्रश्न अद्याप तरी निरुत्तरीतच आहे.
भुयारी गटारांवरील झाकणे गायब
By admin | Published: June 13, 2016 3:59 AM