नागपूर (भाषाप्रभू पु. भा. भावे साहित्य परिसर) : देश हा सर्वोपरी आहे. देशावर एखादे संकट घोंगावत असेल त्यावेळी रक्षणार्थ एखादी व्यक्ती वा संघटना ‘लष्कराच्या सोबतीने आम्ही सीमेवर जाऊन लढू’ असे विधान करीत असेल तर त्या विधानामागचा त्या व्यक्ती वा संघटनेचा मनोभाव समजून घ्या, अशा शब्दात लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी टीकाकारांचे कान टोचले.‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक केवळ तीन दिवसांत प्रशिक्षण घेऊन सीमेवर लढायला जाऊ शकतात’ असे विधान अलिकडेच सरसंघचालकांनी केले होते. त्यावर देशभर उलटसुलट चर्चेची राळ उठली असताना सुमित्रा महाजन यांनी त्या वक्तव्याचे अप्रत्यक्ष समर्थन केले. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीतर्फे नागपुरात आयोजित द्विदिवसीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. विदर्भ साहित्य संघात आयोजित या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. वि. स. जोग तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि जलस्रोत मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व संमेलनाच्या स्वागताध्यक्ष कांचन गडकरी उपस्थित होत्या.सुमित्रा महाजन म्हणाल्या, सावरकरांच्या विचारांचा जागर मांडणारे हे संमेलन समरसतेचे प्रतीक आहे. सावरकर स्वातंत्र्यानंतर जन्माला आले असते तर ते एक उत्तम साहित्यिकच झाले असते. आज कसे जगायचे, याचे आदर्श उदाहरण शोधायला गेलो तर ते सापडत नाही; पण सावरकरांनी आपल्या कृतीतून असा आदर्श उभा केला आहे. त्यांची स्वातंत्र्याप्रतिची भावना जाज्वल्यपूर्ण होती. आज काही मंडळी म्हणतात, स्वातंत्र्य लढ्यात तुमचे योगदान काय? पण जे म्हणतात त्यांचे प्रत्यक्ष काय योगदान आहे हेही त्यांनी कधी सांगितले पाहिजे.या संमेलनाच्या आयोजनामुळे सावरकर समजून घ्यायला मदत होईल, असा विश्वास स्वागताध्यक्ष कांचन गडकरी यांनी व्यक्त केला.यावेळी पाहुण्यांच्या हस्ते ‘जयोस्तुते’ या संमेलन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. या संमेलनाच्या आयोजनासाठी सहकार्य करणारे शिरीष दामले, डॉ. अजय कुळकर्णी, भिकूजी इदाते, रवींद्र साठे, अरुण जोशी, रणजित सावरकर, वामनराव तेलंग, प्रकाश एदलाबादकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
‘आम्ही सीमेवर जाऊ’ म्हणण्यामागचा मनोभाव समजून घ्या! - सुमित्रा महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 2:33 AM