पुणे : पाव व बेकरी उत्पादने जास्त काळ ताजे व मऊ राहावीत यासाठी ब्रॅँडेड कंपन्या ब्रेडमध्ये पोटॅशियम ब्रोमेटसारखी घातक रसायने वापरत असल्याने कॅन्सरसारखे रोग होण्याची शक्यता असल्याने पोटॅशियम ब्रोमेटच्या वापरावर शासनाने बंदी आणावी, अशी मागणी महाराष्ट्र बेकरी उत्पादक श्रमिक महासंघातर्फे करण्यात आली आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट या संस्थेने केलेल्या पाहणीत सुमारे राज्यातील १३ बेकरी उत्पादक कंपन्या उत्पादन दीर्घकाळ टिकावे यासाठी पोटॅशियम ब्रोमेटसारख्या घातक रसायनाचा वापर करीत असल्याचे आढळून आले आहे. ज्यामुळे कॅन्सरसारखा रोग होऊ शकतो. राज्यातील ७० टक्के बेकरी उत्पादक अशा घातक रसायनाचा वापर करीत नाहीत. कारण अशा उत्पादकांचा माल त्याच दिवशी अथवा कायदेशीर ३ दिवसांच्या काळातच संपतो. बड्या कंपन्या प्रचंड नफा कमविण्यासाठी नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. पोटॅशियम ब्रोमेटच्या वापरावर शासनाने बंदी आणावी व कारवाई करावी, अशी मागणी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष नाना क्षीरसागर यांनी केली आहे. अन्न व औषध प्रशासनाने दोषींवर कारवाई करावी, याबाबतचे पत्र संघटनेतर्फे गिरीश बापट यांनाही देणार आहे. बड्या कंपन्यामुळे छोटे उत्पादक अडचणीत आले आहेत आणि याचा बेकरी उत्पादनांवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात सुमारे दोन लाख लहान-मोठ्या बेकऱ्या आहेत, तर सुमारे १० लाख कुटुंबे या व्यवसायावर पोट भरतात. २०१० नंतर बेकरी व्यवसाय विविध कारणांनी डबघाईस आला आहे. पावासारख्या पदार्थांना सर्वच स्तरांतून मोठी मागणी असते. गेल्या १० वर्षांत बेकरीस लागणाऱ्या कच्च्या मालाची किंमत ३३ ते ४० टक्क्यांनी वाढली आहे. -नाना क्षीरसागर, प्रदेश अध्यक्ष,महाराष्ट्र बेकरी उत्पादक श्रमिक महासंघ
ब्रेड उत्पादन करणाऱ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात
By admin | Published: May 30, 2016 1:28 AM