ठाणे : ठाणे महापालिकेतील भाजपाच्या नगरसेविका आशादेवी शेरबहादूर सिंह यांनी अचानकपणे स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने पालिका वर्तुळात आता नाना चर्चांना उधाण आले आहे. पुढील महिन्यात स्थायीच्या आठ सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यांच्या जागी नव्या आठ सदस्यांची नियुक्ती होणार असून यामध्ये स्थायी समिती सभापतींचाही समावेश आहे. याच जागेवर भाजपाच्या एका ज्येष्ठ नगरसेवकाची वर्णी लागावी म्हणून हा राजीनामा दिला गेल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत बिनसलेले अंडरस्टँडिंग आता स्टँडिंगच्या निमित्ताने शिवसेना, भाजपाने पुन्हा जुळवून आणल्याचे यानिमित्ताने म्हणावे लागणार आहे. निवृत्त होणाऱ्या सदस्यांत भाजपाच्या एकही सदस्याचा समावेश नाही. त्यातच महायुतीत झालेल्या करारानुसार सभापतीपद भाजपाकडे जाणार आहे. परंतु, सध्या स्थायीत भाजपाच्या नगरसेविका आशादेवी शेरबहादूर सिंह या आहेत. त्यांनी आता भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेवकाची स्थायीमध्ये वर्णी लागावी म्हणून आधीच राजीनामा दिला आहे. परंतु, सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपाचा सदस्य निवृत्त होत नसल्याने या नगरसेवकाला स्थायी समितीवर कसे पाठवायचे, हा प्रश्न भाजपाला पडला होता. सेनेचे तीन सदस्य या वेळी निवृत्त होत आहेत़ परंतु, शिवसेना त्यांना आपल्या कोट्यातून सदस्यत्व देण्यास तयार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. परिणामी, या नगरसेवकाला जर स्थायी समिती सभापतीपदावर बसवायचे झाल्यास त्याला प्रथम सदस्य म्हणून पाठवणे गरजेचे आहे, त्यामुळेच आशा शेरबहादूर सिंह यांना आधीच बाहेर काढण्यात आल्याचे बोलले जात आहे. आशादेवी यांनी स्थायी सदस्यत्वाचा राजीनामा सभापती सुधाकर चव्हाण यांच्यापुढे बुधवारच्या बैठकीत सादर केला. यावर हा राजीनामा स्थायीऐवजी महासभेत सादर करण्यात यावा, अशी सूचना राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला यांनी केली़ (प्रतिनिधी)
सेना, भाजपात स्टँडिंगसाठी अंडरस्टँडिंग
By admin | Published: January 15, 2015 5:05 AM