- नरेश डोंगरे नागपूर : मायानगरी मुंबई आणि अंडरवर्ल्डमध्ये ज्याची कधीकाळी प्रचंड दहशत होती, त्या अंडरवर्ल्ड डॉनचा बीपी एका परप्रांतीय गुन्हेगाराने चांगलाच वाढवला होता. कट्टर शत्रू डी गँगशी हा गुन्हेगार संबंधित असल्याने तो आपली सुपारी घेऊनच कारागृहात आला असावा, असा संशय ‘डॉन’ला आला. तो कारागृहातून बाहेर जाईपर्यंत ‘डॉन’ कमालीचा अस्वस्थ होता.
कर्नाटकातील कुख्यात गुन्हेगार जयेश कांथा ऊर्फ शाकिर याचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (डी कंपनी) तसेच दहशतवादी अफसर पाशाशी संबंध असल्याची चर्चा आहे. शाकिरने (जयेश) बंगळुरू कारागृहात असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून १०० कोटींची खंडणी मागून धमकीही दिली.
पोलिसांनी त्याला अटक करून नागपुरात आणले. तो कारागृहात पोहोचण्यापूर्वीच त्याची संपूर्ण कुंडली अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडी याला माहीत झाली होती. जयेश ऊर्फ शाकिर लष्कर-ए-तोयबा आणि पीएफआयसोबतच डी कंपनीसाठीही काम करतो, हे कळाल्याने डॉन अस्वस्थ झाला होता. त्यामुळे डॉनने आपल्या साथीदारांच्या मदतीने स्वत:ला अंडरकव्हर करून घेतले.
जेल कॅन्टीनमध्ये शहानिशाखास सूत्रांच्या माहितीनुसार, शाकिर कारागृहात पोहोचल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ‘डॉन’ने जेल कॅन्टीनमध्ये शाकिरला गाठले. ‘तू डी कंपनी का आदमी है. मेरी सुपारी लेकर अंदर आया क्या’ अशी थेट विचारणा केली. शाकिरने नाही म्हटल्यानंतर डॉनचे काहीसे समाधान झाले. त्यानंतर डॉनने शाकिरला ज्यूस आणि सिगारेट पाजल्याचीही माहिती आहे. शाकिर कारागृहातून बाहेर गेल्यानंतर ‘डॉन’ची अस्वस्थता संपल्याचे सांगितले जाते.