लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्यावेळी किती आमदार निवडून आले यापेक्षा आता सोबत किती आहेत याचा आधार घेत भाजपने अजित पवार गटाला ४२ ते ४५ जागा देऊ केल्याने या गटात अस्वस्थता आहे. शिंदेसेनेला ८५ ते ८८ जागा देण्याची भाजपची तयारी आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. त्यामुळेच जागावाटपाचा फॉर्म्युला घटस्थापनेच्या मुहुर्तावर जाहीर झाला नाही असे समजते.
भाजपने १६० जागा लढविण्याची तयारी चालविली आहे. मित्रपक्षांचा दबाव वाढला तर तीन-चार जागा कमी घेण्याची भाजपची तयारी असेल, पण १५५-१५६ पेक्षा कमी जागा घ्यायच्या नाहीत असा आग्रह राज्यातील भाजप नेत्यांनी पक्षनेतृत्वाकडे धरला आहे. राष्ट्रवादीने २०१९ मध्ये ५४ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस व अपक्ष मिळून पाच आमदार त्यांच्यासोबत आहेत. आणखी सहा ते सात जागा मिळाव्यात असा त्यांचा आग्रह आहे.
‘त्या’ जागा सरसकट देऊ नकासूत्रांनी सांगितले की, जागावाटपाच्या चर्चेदरम्यान भाजपच्या नेत्यांनी याकडे लक्ष वेधले की निवडून आलेल्या ५४ पैकी ३८ ते ३९ एवढेच आमदार अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे आज शरद पवार गटाकडे असलेल्या विधानसभेच्या जागा महायुतीत सरसकट अजित पवार गटाला देता येणार नाहीत. शरद पवार गटाकडे असलेल्या बहुतेक आमदारांच्या मतदारसंघांमध्ये आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
‘जागावाटप सन्मानपूर्वक सुरू’अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र नाराजीचा सूर न लावता, जागावाटपाचे काम सन्मानपूर्वक सुरू असल्याचा दावा माध्यमांशी बोलताना केला.
दोन मित्रांसाठी वेगवेगळे निकष का?४०-४२ जागा आम्ही घेतल्या तर आमच्यासोबतच्या विद्यमान आमदारांनाही आम्हाला तिकिटे देता येणार नाहीत ही अडचण अजित पवार गटाने चर्चेत मांडली आहे. विद्यमान आमदारांचा निकष लावता तर शिंदे सेनेकडे अपक्षांसह ५० आमदार आहेत आणि त्यांना ३८-४० जागा जास्त दिल्या जात असतील तर दोन मित्रांसाठी वेगवेगळे निकष का? असा प्रश्नही अजित पवार गटाकडून गेल्या काही दिवसांत झालेल्या जागावाटपाच्या चर्चेत करण्यात येत आहे.
अडचण नेमकी काय?२०१९ मध्ये भाजप-शिवसेनेची युती होती. त्यामुळे गेल्यावेळी शिवसेना पराभूत झाली असे मतदारसंघ शिंदेसेनेला देण्यात भाजपला अडचण नाही. मात्र, राष्ट्रवादी भाजपच्या विरोधात लढलेली होती. राष्ट्रवादीचे जे आमदार आज अजित पवारांसोबत आहेत त्यांच्या मतदारसंघात भाजप-शिवसेनेकडे अनेक ठिकाणी प्रभावी उमेदवार आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादीला महायुतीत अधिक जागा देण्यात अडचणी येत आहेत.‘सिटिंग-गेटिंग’ फॉर्म्युल्याबाबत भाजपला शिंदेसेनेची अडचण नाही पण अजित पवार गटाबाबत अडचण जात आहे.शिंदे सेनेला ८८, अजित पवार गटाला ४२ जागा दिल्या तर भाजपच्या वाट्याला १५८ जागा येतील. हा फॉर्म्युला मान्य व्हावा असा भाजपचा आग्रह असल्याचे म्हटले जाते.अजित पवार यांनी फारच आग्रह धरला तर भाजप आपल्या वाट्याच्या दोन-तीन जागा देईल आणि शिंदे गटालाही दोन-तीन जागा द्यायला सांगेल,अशीही चर्चा आहे.