यवतमाळ : महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीत उपकेंद्र सहायकाच्या एक हजार ९९७ जागांची भरती घेण्यात आली. पात्र उमेदवार कंपनीत रुजू होताच तेथे कार्यरत हजारो कंत्राटी कर्मचार्यांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ही भरती तीन वर्षांच्या कंत्राटावर असून, अनुक्रमे ८, ९ व १० हजार असे वेतन दिले जाणार आहे. या भरतीतील उमेदवार उपकेंद्रावर रुजू होणार असल्याने तेथे कार्यरत कंत्राटी कर्मचार्यांना आतापासूनच बेरोजगारीची हूरहूर लागली आहे. कारण वीज कंपनीमध्ये आऊटसोर्सिंग अर्थात कंत्राटदारांकडे चार हजार आॅपरेटर कार्यरत आहेत. याशिवाय कंत्राटी लेबर म्हणून २० हजार अन्य कर्मचारी आहेत. उपकेंद्र सहायक रुजू होताच त्यांना कंत्राटदाराकडून बाहेरचा रस्ता दाखविला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमएसईबी वर्कर्स फेडरेशनने या संभाव्य बेरोजगारीची कुºहाड कोसळणार्या कर्मचार्यांना रोजंदारी कामगार म्हणून सामावून घ्यावे, यासाठी प्रयत्न चालविले आहेत. हे कामगार गेल्या सात-आठ वर्षांपासून आऊटसोर्सिंगद्वारे काम करीत आहेत. संघटनेच्या प्रयत्नांमुळे त्यांना किमान वेतन, थेट बँकेत वेतन, भविष्य निर्वाह निधी या सुविधा लागू झाल्या असल्या तरी अद्यापही अनेक कंत्राटदारांनी त्याची अंमलबजावणी केलेली नाही. या कंत्राटी कर्मचार्यांसाठी संघटनेचा लढा सुरूच राहणार असल्याचे कार्याध्यक्ष मोहन शर्मा, उपसरचिटणीस कृष्णा भोयर यांनी सांगितले. ६१६ वीज कर्मचार्यांना वेतन कपातीची भीती उपकेंद्र सहायक या पदावर तीन वर्षे काम केल्यानंतर थेट तृतीय श्रेणीचा दर्जा लागू होणार आहे. म्हणून वीज कंपनीचे हेल्पर, वीज तंत्रज्ञ, वीज सहायक, वीजसेवक यांनीही उपरोक्त पदासाठी अर्ज केले. त्यात ६१६ कर्मचार्यांची निवड झाली; परंतु उपकेंद्र सहायक पदावर रुजू झाल्यास आपला पगार कमी होईल, अशी भीती या कर्मचार्यांमध्ये पसरविली जात आहे. मात्र, प्रत्यक्षात असा प्रकार होणार नसून त्यांना उपकेंद्र सहायक पदाची वेतनश्रेणी व सोयीसुविधा मिळणार असल्याचे संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले. त्यासंबंधी ९ मे रोजी बांद्रा येथे मानव संसाधन विभागाचे कार्यकारी संचालक अभिजित देशपांडे, मुख्य महाव्यवस्थापक संदेश हाके व तांत्रिक मुख्य महाव्यवस्थापक मुरलीधर केळे यांच्याशी संघटनेची चर्चाही झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
कंत्राटी वीज कर्मचार्यांवर बेरोजगारीची कु-हाड
By admin | Published: May 15, 2014 6:27 AM