लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - फाटके आणि ध्वनिप्रदूषणावर बंदी असून देखील मीरा भाईंदर मध्ये मात्र सर्रास गुरुवारच्या मध्यरात्रीनंतर देखील मोठ्या आवाजाचे फटाके फोडण्यात आले . या मुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी आणि वायू प्रदूषण होऊन देखील पोलिसांसह महापालिके कडून मात्र कारवाई झाली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे . तर शहरात गुरुवारी रात्री २७ आगीच्या घटना घडल्या आहेत .
मोठ्या आवाजाच्या प्रदूषणकारी फटाक्यांना बंदी असून त्याच सोबत ध्वनिप्रदूषण नियंत्रण कायदा आदींचे मीरा भाईंदर मध्ये दिवाळी निमित्त सर्रास उल्लंघन केलेले दिसून आले . गुरुवारी तर मध्यरात्री नंतर देखील सर्रास मोठे फटाके फोडले जात होते . शुक्रवारी रात्री देखील तशीच स्थिती होती .
मुळात महापालिकेनेच नियमबाह्यपणे फटाके विक्रीच्या वारेमाप परवानग्या देऊन मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आणि भारतीय विस्फोटक कायद्यासह शासन आदेशाचे उल्लंघन केले . लोकांच्या सुरक्षे ऐवजी फटाके विक्रेत्याना फायदा करून देत त्यांची मर्जी सांभाळली . पालिकेनेच शहरात फटाके फोडण्यासह ध्वनी व वायू प्रदूषण करण्यास मोकळीक दिली .
त्यातच गुरुवारी रात्री शहरात तब्बल २७ ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत . त्या मध्ये तब्बल १९ ठिकाणी आगी ह्या फटाक्यांच्या कचऱ्या मुळे तर ७ ठिकाणी आगी ह्या शॉर्टसर्किट मुळे तर रामदेव पार्क येथील एका गॅरेजला आग लागल्याचे अग्निशमन दला कडून सांगण्यात आले .
बहुतांश आगी ह्या फटाक्यां मुळे लागलेल्या असल्याचे स्पष्टच असून महापालिका आणि नगरसेवक ह्याला कारणीभूत असल्याचे आरोप जागरूक नागरिक करत आहेत . फटाक्यां मुळे निर्माण झालेल्या प्रचंड धुराचे वलय आकाशात दिवसा सुद्धा जाणवत होते . धुरा मुळे आणि आवाज मुळे रुग्ण , वृद्ध व बाळांना त्रास सहन करावा लागला .
ओम वसुंधरा इमारतीत कपड्याच्या दुकानास आग लागून ३ लाखांचे नुकसान झाले . पूनम गार्डन , सिल्वर पार्क , नया नगर , विजय पार्क , पेणकरपाडा , कनकिया , ठाकूर मॉल जवळ , विनय नगर , शिवार उद्यान , डिव्हाईन चर्च समोर, भीमसेन जोशी रुग्णालया जवळ , भाईंदर बसडेपो जवळ , आझाद नगर आदी परिसरात आगी लागण्याच्या घटना घडल्या . महापालिकेच्या त्या त्या भागातील अग्निशमन दलाच्या जवानांनी जाऊन आगी नियंत्रणात आणल्या . सुदैवाने कोणत्या घटनेत जीवित हानी झालेली नाही .