लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : शुक्रवार सायंकाळी ७च्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसाचा फटका पनवेल तालुक्यासह नवी मुंबई शहराला बसला. तालुक्यातील ग्रामीण भागात घराचे मोठे नुकसान झाले. या घरांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी शेकाप, भाजपा नेत्यांनी शनिवारी केली. तालुक्यातील टेंभोडे, वळवली आदिवासीपाड्यातील घरांचे यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरांची छप्परे उडाली आहेत, तर काही ठिकाणी भिंतींना तडे गेले आहेत. अशा परिस्थितीत नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी, अशी मागणी भाजपा आमदार प्रशांत ठाकूर, शेकाप आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार विवेक यांनी केली. दोन्ही पक्षांच्या शिष्टमंडळाने वेगवेगळे पाहणी दौरे केले. अवकाळी पावसाने पनवेल तालुक्यासह शहरातील जनजीवन विस्कळीत केले. महापालिकेच्या निवडणुकीसाठी सध्या पनवेलमध्ये जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे प्रचार काहीसा थंडावला. मुसळधार पावसामुळे शहरातील उद्यानात काही वृक्ष कोलमडले. तळोजा परिसरातील चिंध्रण, पढघे, वलप या गावांमधील घरांची कौले उडाली. वादळी वाऱ्यामुळे काही वेळासाठी वीजपुरवठाही खंडित झाला होता. >पनवेल महापालिकेत सध्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नेतेमंडळींकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शुक्रवारी वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातील घरांचे मोठे नुकसान झाले. याशिवाय अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला होता. एरवी अशा घटना घडल्यावर नुकसानभरपाईसाठी नागरिकांना सरकार दरबारी खेटे मारावे लागतात. मात्र, शनिवारी भाजपा, शेकापच्या नेत्यांनी ग्रामीण भागातील नुकसानग्रस्त कुटुंबीयांची भेट घेतली आणि भरपाईसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान
By admin | Published: May 14, 2017 2:04 AM