ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. ३० : नियंत्रण रेषा ओलांडून चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेला भारतीय जवान चंदू चव्हाण पाकिस्तानात पकडला गेल्याचे वृत्त बोरविहीर गावात धडकले आणि सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला़ जामनगरला चंदूच्या मोठ्या भावाच्या घरी सैन्यदलाच्या नियंत्रण कक्षातून आलेल्या फोनने सर्वांनाच हादरवून सोडले़ दरम्यान चंदू पकडला गेल्याचे समजताच त्याच्या आजारी असलेल्या आजी लिलाबाई चिंधू पाटील यांना जामनगर येथेच ह्दयविकाराचा झटका आला व त्यांची प्राणज्योत मालवली़
कौटुंबिक पार्श्वभुमी़आई-वडील काय असतात हे कळण्यापूर्वीच म्हणजेच चंदूच्या बालपणीच त्याचे आई-वडील अनंतात विलीन झाले़ त्याचे वडील मुळचे पाचोरा तालुक्यातील सामनेरचे होते़ आई-वडील नसल्याने लहानपणापासूनच चंदू आपला मोठा भाऊ भूषण आणि बहिणी सोबत आजोबा चिंधा पाटील (सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी) आणि आजी लिलाबाई यांच्याकडे बोरविहीर येथेच लहानाचा मोठा झाला़ मोठा भाऊ भूषण २००८ मध्ये सैन्यात भरती झाला असून तो विवाहीत आहे़ तर बहीण रूपालीचा देखील गेल्या वर्षीच विवाह झाला असून ती इंदूर येथे असते़ अवघ्या २३ वर्षांच्या चंदूलाही २०१२ मध्ये देशसेवेची संधी मिळाली़ तो सध्या राष्ट्रीय रायफल्स तुकडीत होता़ चंदूचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे़
आजीला धक्काचंदू व त्याच्या दोन्ही भावंडांचा सांभाळ आजी लिलाबाई चिंधा पाटील व आजोबा चिंधा धोंडू पाटील (आईचे आईवडील) यांनी केला़ भुषण हा सैन्यात भरती झाल्यानंतर सध्या जामनगर येथे वास्तव्यास होता़ चंदूच्या आजी लिलाबाई पाटील या जामनगर येथे भुषणकडे काही दिवसांपासून वास्तव्यास होत्या़ गुरूवारी रात्री भुषणला सैन्य दलाकडून फोन आला व चंदू घराकडे परतला आहे का? अशी विचारणा झाली़ तोपर्यंत पाकिस्तानातील डॉन वृत्तपत्रातील वृत्ताच्या अनुषंगाने बेपत्ता जवान चंदूच असल्याचे संदेश सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते़ भुषणने गावाकडे विचारणा केली असता त्याच्या मित्रांनी तो गावात आला नसून सोशल मिडीयावरील संदेशाची त्याला कल्पना दिली़ त्यानंतर चंदू चुकून पाकिस्तानात गेल्याचे स्पष्ट झाले़ त्यानंतर बोरविहीर येथील तरूण योगेश पाटील, दिलीप साळूंखे यांनी तत्काळ केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांच्याशी संपर्क साधून चंदूची माहिती त्यांना दिली़ तर दुसरीकडे घटनेची माहिती भुषणने घरात सांगितल्यानंतर आजी लिलाबाई पाटील यांना धक्का बसला व मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली़
चंदू़़़लवकर परत ये!चंदूचे आजोबा सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी चिंधा पाटील यांना या घटनेमुळे अश्रू अनावर झाले होते़ लिलाबाई यांचे पार्थिव भूषण चव्हाण हे रात्री आठ वाजता घेऊन आल्यानंतर यांच्यावर रात्री आठ वाजता बोरविहीर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले़ यावेळी पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावल, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे उपस्थित होते़ चंदू आजीचे अंत्य दर्शन घ्यायला असणार नाही, याचे मोठे दु:ख आहे़ चंदू़़़ तु लवकर परत ये अशी भावनिक साद आजोबा चिंधू पाटील घालत होते़ दरम्यान उरी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी चंदूचे बोरविहीर येथील मित्र योगेश पाटील व दिलीप साळूंखे यांच्याशी बोलणे झाले होते, त्यावेळी त्याने सुटी मिळाली तर ३० तारखेपर्यंत घरी येणार असल्याचे सांगितले होते़
चंदू आदर्श विद्यार्थीचंदूने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले होते़ बोरविहीर येथील सहकारमहर्षी पि़रा़पाटील विद्यालय व मोहाडीच्या पिंपळादेवी विद्यालयात त्याने शिक्षण घेतले होते़ चंदू पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्याने त्याच्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही शुक्रवारी या घटेनची कल्पना देण्यात आली़ बोरविहीरच्या पि़रा़पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांनी चंदू लवकर परत यावा, यासाठी प्रार्थना केली़चंदू मायदेशी परतणारच़़नियंत्रण रेषा ओलांडून चुकून पाकच्या हद्दीत गेलेला धुळे तालुक्यियातील बोरविहीर येथील जवान श्री. चंदू बाबूलाल चव्हाण हा मायदेशी परतणारच त्यामुळे घाबरू नका, संयम ठेवा असे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितले. बेपत्ता जवान चंदू चव्हाण यांना भारतात आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून गंभीर प्रयत्न केले जात आहेत. भारत किंवा पाकचे जवान नियंत्रण रेखा ओलांडणे या घटना नित्याच्याच आहेत. सीमेवर सर्वच ठिकाणी कुंपण नसते त्यामुळे कधी पाकचे तर कधी भारताचे जवान सीमारेषा ओलांडतात, असले प्रकार अनावधानाने घडत असतात़ त्यामुळे या जवानाचे त्याबाबत ची माहिती दोन्ही देशाच्या लष्कररांकडून एकमेकांना दिली जाते.
कागदोपत्री सोपस्कार पार पडल्यानंतर, शहानिशा केल्यानंतर जवानांना त्यांच्या त्यांच्या देशात पाठविले जाते साधारणपणे २० दिवसात सदर प्रक्रिया पूर्ण होते. सध्या भारताने पाक हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक केल्याने वातावरण तणावपूर्ण आहे. त्यामुळे चंदू चव्हाणच्या घर वापसीला थोडा वेळ लागु शकतो, मात्र चंदू घरी परतणारच असा खात्रीशीर विश्वास ना. डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केला आहे़