मुंबई - राज्याच्या विविध संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी कौशल्य विकास विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच सर्व प्रकारच्या आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश बंधनकारक असेल.
आयटीआय, तंत्रशिक्षण संस्था, कौशल्य विकास संस्थांमध्ये विद्यार्थिनींची संख्या मर्यादित असल्याने प्रत्येक संस्थेत २० विद्यार्थिनींमागे एक महिला निदेशकाची (लोकल गार्डियन) नियुक्ती करण्यात येणार आहे. विद्यार्थिनींना वसतिगृहाबाहेर कुठेही जायचे असल्यास या निदेशकांची लेखी परवानगी बंधनकारक असेल. तसेच संस्थेत परवानगी न घेता गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थिनींची माहिती तत्काळ पालकांना देण्यात येईल.
राज्यातील सर्व शासकीय / खासगी आयटीआय, कौशल्य विद्यापीठ, खासगी कौशल्य विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ व शासकीय तांत्रिक विद्यालये या संस्थांना या सूचना लागू असतील. महिला वसतिगृहातील अधीक्षक, सफाई कर्मचारी, पहारेकरी आणि अन्य कामाकरीता महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती बंधनकारक असेल. महिला अधीक्षकांना वसतिगृहात वास्तव्य अनिवार्य असेल. वसतिगृहातील भोजन व्यवस्था महिला बचत गटांमार्फत करण्यात यावी, असे सूचनांमध्ये म्हटले आहे.
पोलिसांमार्फत चारित्र्य पडताळणी केल्यानंतरच सर्व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. विद्यार्थिनींच्या प्रवासी खासगी बस, टॅक्सी, व्हॅनमध्ये एक महिला कर्मचारी ठेवणे सक्तीचे असेल. शिवाय प्रत्येक कॅम्पसमध्ये रुग्णवाहिकेसह प्राथमिक आरोग्य सेवा केंद्राबाबत स्थानिक सार्वजनिक आरोग्य संस्थेची मदत घ्यावी, असे सूचनांमध्ये म्हटले आहे.
काय आहेत मार्गदर्शक सूचना? कॅम्पसमध्ये कुठेही अंधार नसावा. एक्स्प्रेस फिडरद्वारे अखंडित वीज पुरवठा उपलब्ध करावा. तसेच सौरउर्जेद्वारे संपूर्ण संस्थेत वीजपुरवठ्याची सोय असावी. कॅम्पस ग्रामीण किंवा शहराबाहेर आहेत, अशा परिसरात बाहेरील लोकांचा कॅम्पसमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी सीमा भिंत उभारणे आवश्यक. संस्था प्रवेशद्वार, संस्थेचा दर्शनी भाग, कार्यालय, वर्गखोल्या, कार्यशाळा, स्वच्छतागृहाच्या बाहेरील बाजूस आणि आवश्यक तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. संस्थेत कंट्रोल रूम असावी आणि तिची तपासणी बीट मार्शल, पोलिस पथकांनी वेळोवेळी करावी. प्रत्येक संस्थेत “विशाखा समिती” नियुक्त करावी.