पुणे : महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळेतील तब्बल एक लाख मुलांची गणवेशासाठीची परवड यंदाही सुरूच राहणार आहे. हे गणवेश घेण्यासाठी पालिका प्रशासनाने मफतलाल कंपनीला दिलेला ठेका रद्द करून गणवेश खरेदीसाठी नव्याने निविदाप्रकिया राबविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया नव्याने राबविण्यात येणार असून, यंदा मुलांना गणवेश मिळण्यासाठी दिवाळीच उजाडणार आहे. राज्य शासनाकडून शिक्षण मंडळ सदस्यांकडे असलेली ही खरेदीप्रक्रिया महापालिका प्रशासनाकडे दिली असली तरी त्यातील गोंधळ अद्याप थांबतच नसल्याने ही स्थिती निर्माण झाली असून, मुलांवर शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. या वर्षी पालिकेकडून मे महिन्यापूर्वीच गणवेश खरेदीप्रक्रिया राबवूनही विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश मिळालेले नाही. जवळपास १ लाख विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी दोन गणवेश याप्रमाणे पालिका प्रशासनाने जवळपास दोन लाख गणवेशांच्या खरेदीसाठी निविदाप्रकिया राबविली होती. त्यात पात्र ठरलेल्या मफतलाल कंपनीला गणवेश पुरविण्याचा ठेका देण्यात आला होता. त्यासाठी २६ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, या प्रकरणी राबविण्यात आलेल्या निविदाप्रक्रियेबाबत मफतलाल कंपनीला देण्यात आलेल्या कामाच्या विरोधात गणवेश निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या पेपरमेड या कंपनीकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने पालिका प्रशासनासह मफतलालवर ताशेरे ओढत गणवेश खरेदीसाठी पुन्हा नव्याने फेरनिविदा राबविण्याचे आदेश दिले आहेत.
गणवेश खरेदीप्रक्रियाच रद्द
By admin | Published: August 12, 2016 1:14 AM