नागपूर : राज्यात मोठ्या प्रमाणावर होणारे रस्ते अपघात आणि त्यातील मृत्यूंबाबत सरकारने सारे खापर वाहनचालकांवरच फोडले आहे. मुंबई-पुणे महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर २०१४ पासून झालेल्या अपघातात ९३८ जणांचा बळी गेला असून २,३२२ जण जबर जखमी झाले आहेत.मात्र, हे अपघात पोलिसांच्या दुर्लक्षामुळे झाले नसून वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे, धोकादायक ओव्हरटेक व अविचाराने, हयगयीने वाहन चालविल्यामुळे झाल्याचे अजब तर्क राज्य सरकारने मांडले आहे.रस्ते अपघाताबाबत भाजपाच्या अतुल भातखळकर यांच्यासह २० सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. देशातील अपघाती मृत्यूंबाबत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून अपघात रोखण्यासाठी सरकारने काय कार्यवाही केली असा प्रश्न या सदस्यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिले. २०१७ मध्ये ३५,८५३ अपघातात १२,२६४ जणांचा मृत्यू झाला. तर, २०,४६५ लोक गंभीर जखमी झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या लेखी उत्तरात नमूद केले. २०१८ च्या जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात राज्यात ९,२४३ अपघात झाले असून त्यात ३३६१ लोकांचा मृत्यू झाला. शहरी भागातील अपघातांचे प्रमाण २७ टक्के असून मृत्यूचे प्रमाण १७ टक्के आहे. तर, ग्रामीण भागातील अपघातांचे प्रमाण ७३ टक्के आणि मृत्यूचे प्रमाण ८३ टक्के आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या २०१५ च्या अहवालानुसार रस्ते अपघातात महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो असेही या उत्तरात नमूद करण्यात आले आहे.मुंबई-पुणे, मुंबई-गोवा आणि राष्ट्रीय महामार्ग १६६ वर तीन वर्षात ९३८ जणांचा मृत्यू झाला असून २३२२ जबर जखमी तर ९३२ जण किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, हे अपघात केवल वाहनचालकांच्या अविचारीपणामुळे झाल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी उत्तरात केला आहे. तर, केंद्र सरकारच्या निकषानुसार राज्यात १३२४ अपघातप्रवण क्षेत्र असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.>पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट पूर्णमुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील ३०४ पुलांच्या स्ट्रक्चरल आॅडिटचे काम पूर्ण झाले आहे. ३०४ पैकी ११४ पूल सुस्थितीत असून १११ पुलांची किरकोळ दुरुस्ती करावी लागणार आहे. १८ पुलांची पुनर्बांधणी आवश्यक असून ६१ पुलांना मोठ्या दुरुस्तीची गरज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे वर्षा गायकवाड आणि अमिन पटेल यांनी मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील पुलांबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी आॅडिटचे काम पूर्ण झाल्याचे स्पष्ट केले. याशिवाय, अहवालानुसार पुलांच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीच्या कामासाठी महापालिकेने निविदा प्रक्रियाही सुरू केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अपघातांचे खापर वाहनचालकांवर, सरकारचा अजब तर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 4:00 AM