कळंबोली : पायाभूत आराखडा योजनेंतर्गत कळंबोली आणि खारघरच्या काही भागाला सुरळीत वीजपुरवठा करण्याकरिता रोडपाली येथे नवीन उपकेंद्र उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दीड - दोन महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे लवकरच कळंबोलीकरांना अखंडित वीजपुरवठा होणार आहे. कळंबोली परिसराची लोकसंख्या दोन लाखांवर पोहचली आहे. या ठिकाणी जवळपास २२ हजार ग्राहक आहेत. दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. कळंबोलीला तळोजा फिडर आणि या ठिकाणी असलेल्या उपकेंद्रातून वीजपुरवठा करण्यात येतो. हे अंतर ६ कि.मी. असल्याने वीज गळती मोठी आहे. शिवाय जुनाट वाहिनी आणि गंजलेल्या पोलमुळे वारंवार तांत्रिक बिघाड होऊन बत्ती गुल होणे, ही नित्याचीच बाब आहे. विद्युत वाहिनीची लांबी असल्याने बिघाड शोधण्याकरिताही विलंब लागतो. त्यामुळे कळंबोलीकरांना नियमित वीज बिले भरूनही आजघडीला खंडित वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. या नोडमधील विजेचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी सातत्याने होत होती. त्याचबरोबर कळंबोली नोडकरिता स्वतंत्र व्यवस्था असावी, असा प्रस्ताव अनेक वर्षे प्रलंबित होता. महावितरणने सिडको प्रशासनाकडे भूखंडाकरिता मागणी केली होती. त्यानुसार दोन वर्षांपूर्वी भूखंड हस्तांतरित झाल्यावर महावितरणने उपकेंद्र उभारण्याचे काम हाती घेतले. तळोजा सबस्टेशनपासून कळंबोलीला भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे कळंबोलीकरांना दोन पर्याय उपलब्ध झाले आहेत.तळोजा उपकेंद्रावरील भार कमी तळोजा उपकेंद्रातून निघणाऱ्या १००/२२ केव्ही वीज वाहिनीवरून कळंबोलीला वीजपुरवठा करण्यात येतो. या उपकेंद्रावरून तळोजा परिसरातही वीज पुरविली जातेच त्याचबरोबर कळंबोलीचाही अतिरिक्त भार आहे. रोडपाली या ठिकाणी नवीन उपकेंद्रामुळे तळोजा उपकेंद्राचा भार कमी होईल, असा विश्वास महावितरणच्या अधिकाऱ्यांना आहे.>रोडपाली येथे नवीन सबस्टेशनसिडकोने कळंबोलीकरांची गैरसोय दूर करण्यासाठी रोडपाली सेक्टर २० या ठिकाणी १२९३ चौरस मीटरचा भूखंड वीज उपकेंद्राकरिता दिला आहे. तांत्रिक बाबींची पूर्तता करून ही जागा महावितरणला वर्ग केल्यानंतर प्रत्यक्ष उपकेंद्राच्या कामाला सुरुवात करण्यात आली. हे काम अंतिम टप्प्यात असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. प्रस्तावित उपकेंद्रातून कळंबोली वसाहत, लोह-पोलाद बाजार, कोपरा, सिमेन्स कंपनी, मार्बल बाजार, रोडपाली या भागाला वीजपुरवठा होणार आहे.>कळंबोली से.२० मध्ये महावितरणने उपकेंद्र उभारले आहे. हे काम दीड ते दोन महिन्यांत पूर्ण होऊन उपकेंद्र कार्यान्वित करण्यात येईल. यामुळे परिसरातील वीजपुरवठा सुरळीत होईल. त्याचबरोबर तांत्रिक बिघाड होऊन वारंवार दुरुस्तीकरिता शटडाऊन घेण्याची गरज भासणार नाही. - डी. बी. गोसावी, कार्यकारी अभियंता, महावितरण, पनवेल विभाग
कळंबोलीकरांना अखंडित वीज
By admin | Published: June 11, 2016 2:42 AM