केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पात गरीब, महिला, युवक आणि शेतकऱ्यांवर भर देण्यात आला आहे. सबका साथ, सबका विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे. रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पाच नव्या स्कीमच्या घोषणा करण्यात आली आहे. तसेच शेतीमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी निरनिराळे उपाय करण्यात येणार आहेत. अर्थसंकल्पात तरुणांसाठी २ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.
भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी "विकसित भारताच्या स्वप्नाकडे दमदार उड्डाण करणारा हा अर्थसंकल्प आहे" असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. तसेच महिला, तरुण, विद्यार्थी, शेतकऱ्यांना भरघोस मदत करणारा, गरिबांची काळजी करणारा आणि करदात्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प असल्याचं देखील म्हटलं आहे. आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"अर्थसंकल्पातून "विकसित भारताचे" दमदार उड्डाण! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या विजयानंतर अर्थमंत्री निर्मला सितारामन् यांनी आज जाहीर केलेला अर्थसंकल्प महिला, तरुण, विद्यार्थी, शेतकऱ्यांना भरघोस मदत करणारा, गरिबांची काळजी करणारा आणि करदात्यांना दिलासा देणारा आहे."
"देशाची औद्योगिक उत्पादन क्षमता वाढेलच पण सोबत पर्यावरणाचा समतोल राखला जाईल आणि रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील शिवाय शाश्वत शेतीला प्रोत्साहन मिळेल असा हा अर्थसंकल्प आहे. विकसित भारताच्या स्वप्नाकडे दमदार उड्डाण करणारा हा अर्थसंकल्प आहे! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार!!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
अर्थसंकल्पात महिलांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा; १-२ हजार कोटी नव्हे तर ३ लाख कोटी
निर्मला सीतारामन यांनी महिलांच्या विकासासाठी ३ लाख कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली आहे. महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढावी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी केली. मुद्रा लोनच्या मर्यादेत वाढ करण्यात आल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. यापूर्वी या योजनेंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचं कर्ज देण्यात येत होतं. आता त्यात वाढ करण्यात आली असून त्या अंतर्गत २० लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळणार आहे.