Ramdas Athawale News: देशभरात अनेकविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. एनडीएचे मित्र पक्षही इंडियातील घटक पक्षांवर टीका करताना दिसत आहेत. आगामी पाच राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दावे-प्रतिदावे वाढताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका करताना, त्यांना भारत जोडो यात्रा काढण्याचा कोणताही अधिकार नाही, असे म्हटले आहे.
मीडियाशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकरांनी भारत जोडण्याचे काम केले. कायद्याने जातीव्यवस्था संपवण्यात आली आहे. त्यामुळे भारत जोडलेलाच आहे. पण, जोडला नसेल, तर काँग्रेसने का जोडला नाही? सगळ्या राज्यांत काँग्रेसची सत्ता असताना काय केले? ही भारत जोडो नाहीतर भारत तोडो यात्रा होती, या शब्दांत रामदास आठवले यांनी हल्लाबोल केला.
राहुल गांधींना ‘भारत जोडो’ यात्रा काढण्याचा कोणताच अधिकार नाही
राहुल गांधींना ‘भारत जोडो’ यात्रा काढण्याचा कोणताच अधिकार नाही. राहुल गांधींच्या यात्रेचा फारसा परिणाम होईल, असे वाटत नाही. इंडिया हे आपल्या देशाचे नाव आहे. देशाच्या नावावर निवडणूक लढणे योग्य नाही. आम्ही याचा विरोध केला, तर इंडियाला विरोध करतायत असे म्हणतील, असा खोचक टोला रामदास आठवले यांनी लगावला.
दरम्यान, राहुल गांधींना भारत जोडो यात्रा काढण्याची वेळ का आली? सत्तर वर्षे काँग्रेस काय करत होती? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून भारताला जोडण्याचे काम केले. हिंदू-मुस्लीम, हिंदू-दलित वाद होत असले, तरी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवले की, जात-धर्म-भाषेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. देशावर संकट आल्यानंतर सर्वांनी लढले पाहिजे, असे रामदास आठवले म्हणाले.