Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडले. टोकाला गेलेल्या संघर्षानंतर आता शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवण्यात आले आहे. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाला राज्यातून प्रचंड पाठिंबा मिळत आहे. यातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजपच्या केंद्रातील एक बड्या नेत्याने शिवसेनेचे ४ आमदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेनेमध्ये बंड करून एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना फोडल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांची संख्या आता १५ वर आली आहे. अशा वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील आणखी काही आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असून, त्यातील चार आमदार आपल्या संपर्कात आहेत, असा दावा भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. काही जण पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत
उद्धव ठाकरे गट आता राहिलेला नाही. शिवसेना संपत चालली आहे. शिवसेना ५६ आमदारावरून आता ६-७ वर आली आहेत. त्यातीलही काही जण पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. यातील ४ आमदार माझ्या संपर्कात आहेत. लवकरच माहिती सांगेन, असेही राणे म्हणाले. दुसरीकडे, शिधावाटपाला काहीही उशीर झाला नाही. त्यावर फोटो लावला तर काय बिघडले, फोटोवर आक्षेप घेणे ही संकुचित वृत्ती झाली. यावरून विनाकारण राजकारण सुरू आहे. आता त्यांच्या हातात काहीही राहिले नाही, त्यामुळे घरबसल्या षड्यंत्र करत राहायचे असे एकच काम आहे. ठाकरे सोडून महाराष्ट्र, देश आहे ना? ते फक्त मातोश्रीपुरते उरले आहेत. माझ्यासारखे जे होते ते साहेबाच्या काळात होते. आता कुणी नाही, असा टोला राणे यांनी लगावला.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी राजकारणाचा स्तर घसरला असल्याची टीका केली होती, यावर बोलताना, या म्हणण्यात तथ्य नाही. जे बोलतात त्यांचाच स्तर खालावला आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे वैचारिक स्तर घसरू नये, असे राणे यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"