Maharashtra Politics: शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) हे औरंगाबाद दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी थेट बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संवाद साधला. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांनी यांच्यावरच पहिला आसूड ओढला पाहिजे, या शब्दांत दानवे यांनी ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे.
आसूड फक्त हातात ठेवू नका तो वापरा. सरकारला पाझर फुटत नसेल तर घाम फोडा. आमच्याशी गद्दारी केली, शेतकऱ्यांशी करू नका. या निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ अन् केवळ घोषणांची अतिवृष्टी असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली. याला रावसाहेब दानवेंनी प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.
उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडले नाही
राजा जनतेत जाणार नाही तोपर्यंत जनतेचे दुःख कळणार नाही. हे अनेकवेळा आम्ही त्यांना सांगितले. पण, उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडले नाही. आपले कुटुंब आपली जबाबदारी एवढेच काम त्यांनी केले. आता, एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार आपल्यासोबत घेतल्यावर सत्ताबदल झाला. तेव्हा लोकांत गेल्याशिवाय जनसमर्थन मिळत नाही. हे उद्धव ठाकरे यांना समजले. त्यामुळे उद्धव ठाकरे हे लोकांमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे, असे रावसाहेब दानवे म्हणाले. तसेच विरोधी पक्षाचा माणूस जनतेत जातो. त्यांचे प्रश्न विचारतो. त्यांना शेतकऱ्यांनी आसूड दिला. तो आसूड चालविण्याचा त्यांनी सुतोवाच केला. त्यांचे प्रश्न यांनी सोडविलेले नाहीत. त्यामुळे पहिला आसूड यांच्यावर ओढला पाहिजे. नंतर त्यांनी अशी भाषा वापरली पाहिजे, असेही दानवे म्हणाले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आता बाहेर पडले. काही ठिकाणी दौरे करू लागलेत. याचे क्रेडिट हे त्यांना स्वतःला जात नाही. याचे क्रेडिट हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांना जाते. कारण अडीच वर्षे ना मंत्रालयात गेले ना राज्यात गेले. घरी बसून कारभार केला, असा टोलाही दानवे यांनी लगावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"