मुंबई - जोगेश्वरी येथील जनसंवाद यात्रेला केंद्रीय मंत्री नारायण राणे काल तब्बल तीन तास उशिरा आले. मात्र भर पावसात सुमारे तीन हजार जोगेश्वरीकर त्यांच्या स्वागतासाठी थांबले होते. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात, येथील श्याम नगर तलावाजवळ त्यांची मोठी सभा झाली. आपल्या सुमारे 20 मिनिटांच्या भाषणात त्यांनी येथील स्थानिक आमदार,माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर घणाघाती टीका केली.
भाजप उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष संतोष मेढेकर आणि राणे समर्थक व जोगेश्वरी पूर्व विधानसभा उपाध्यक्ष दत्ता शिरसाट यांनी मंत्रीमहोदयांच्या स्वागताची जोरदार तयारी केली होती. ढोल ताशांच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले तर यापरिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजीही करण्यात आली होती.
आमदार वयकर हे शिवसेनेत आहेत, असे वाटत नाही. शिवसेनेत ते आमदार, मंत्री झाले, मात्र एक मंत्र त्यांना चांगला अवगत झाला आहे, तो म्हणजे टक्केवारीचा. प्रत्येकात त्यांची पार्टनरशिप आहे. घरबांधणीच्या कामात तर त्यांच्या पत्नीच्या नावे 28 कंपन्या आहेत, असा आरोप त्यांनी केला. त्यांच्या मतदार संघात 50 टक्के गृहनिर्माण प्रकल्प बंद आहेत आणि येथील मराठी जनता बेघर झाली आहे. तुम्ही स्वस्थ कसे बसता? तुम्हाला झोप कशी येते? असा सवाल त्यांनी येथील जनतेला केला.
गेली 32 वर्षे मुंबई महानगर पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. जगातील इतर शहरे बघा आणि आपली मुंबईची दैन्यावस्था बघा. त्यांनी मुंबई बकाल केली आहे. ठिकठिकाणी दुर्गंधी आहे. आगामी पालिका निवडणुकीत आणि राज्यात भाजपची सत्ता आल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही. आपण केंद्रात जरी मंत्री असलो तरी आपले वास्तव्य मुंबईत असेल, असेही राणे यांनी स्पष्ट केले.
यावेळी केंद्रीय मंत्री केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविषयी कृतज्ञताही व्यक्त केली. गेल्या सात वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाला जगात महासत्ता दाखवणारा रस्ता दाखवला. 135 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात त्यांनी कोरोनाची सुरवात झाल्यावर लसनिर्मितीला प्राधान्य दिले आणि प्रभावी उपाययोजना करून कोरोना नियंत्रणात आणला. तर महाआघाडी सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे देशातील 1/3 मृत्यू हे आपल्या महाराष्ट्रात झाले. येथे 1,36000 कोरोनाने मृत्यूमुखी पावले, अशी आकडेवारी त्यांनी दिली.
यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोंढा,आमदार अमित साटम, आमदार सुनील राणे, आमदार कालिदास कोळंबकर, नगरसेविका उज्वला मोडक, नगरसेविका प्रीती सातम, जिल्हाध्यक्ष संतोष मेढेकर आणि उपाध्यक्ष दत्ता शिरसाट आदी उपस्थित होते.