धुळे: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. धुळे जिल्हा आणि सत्र न्यायालयाने नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. महाड येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसैनिकांनी राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना, न्यायालयाने नारायण राणे यांना दिलासा दिला आहे. अनिकेत उज्ज्वल निकम यांनी नारायण राणे यांची बाजू मांडली.
धुळे सत्र न्यायालयात ४ मे रोजी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. धुळे जिल्हा व सत्र न्यायधीश आर. एच मोहंमद यांनी नारायण राणे यांना दिलासा देत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध लावण्यात आलेली कलमे सकृतदर्शनी चुकीची आणि बेकायदेशीर आहेत, असे आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याचे कारण म्हणजे नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे कोणत्याही समाजात तेढ निर्माण झालेली नाही, किंवा समाजिक शांततेचा भंग देखील झालेला नाही, अशी माहिती अनिकेत उज्ज्वल निकम यांनी दिली.
राणे यांना चौकशीसाठी देखील बोलावलेले नाही
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गेल्या कित्येक महिन्यांपासून नारायण राणे यांना चौकशीसाठी देखील बोलावलेले नाही. परंतु, धुळे सत्र न्यायालयात जेव्हा आम्ही त्यांच्या अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला, तेव्हा पोलिसांनी आम्हाला राणे यांची चौकशी करायची असल्याने त्यांचा अटकपूर्व जामिनासाठी आलेला अर्ज फेटाळून लावा अशी विनंती न्यायालयाला केली. ही विनंतीच चुकीची आहे आणि कायद्याला धरून नसल्याचे आम्ही न्यायालयाला सांगितले, असे अनिकेत उज्ज्वल निकम यांनी सांगितले.