उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरें यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख 'नागपुरला लागलेला कलंक' असा करताच भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात विविध ठिकाणी सत्ताधारी भाजपने ठाकरेंच्या विधानाच्या निषेधार्थ आंदोलने केली. भाजपा नेत्यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या विधानाचा निषेध केला. अशातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरेंवर बोचरी टीका केली असून कलंक शब्दाचे परिणाम भविष्यात उद्धव ठाकरेंना भोगावे लागतील असा इशारा दिला.
उद्धव ठाकरेंवर प्रहार करताना राणे म्हणाले की, सत्ताही गेली, पक्षही संपला या निराशेपोटी नागपूरच्या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेले वक्तव्य हे निराशेपोटी व बौध्दिक पातळी खालवल्यानेच केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलच्या राग व द्वेषापोटी केलेली ही टीका आहे. उद्धव ठाकरे यांची मानसिक स्थिती सध्या चांगली नाही. त्यांना कधीही बौद्धिक व विधायक बोलता येत नाही म्हणूनच शिव्या देणे व खालच्या पातळीवर येऊन नको ती टीका करणे हेच त्यांचे सध्या काम उरले आहे.
तसेच महाराष्ट्राच्या कोणत्याही पक्षाचा पुढारी अशाप्रकारचे खालच्या दर्जाचे वक्तव्य कधीच करीत नाही.माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाशी गद्दारी करून मुख्यमंत्री पद मिळवणारा उद्धव ठाकरे हाच महाराष्ट्राला लागलेला खरा कलंक आहे, असेही राणेंनी म्हटले. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली.
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा"ज्याला माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सांभाळता आले नाहीत, सख्या भावांशी नाते जोपासता आले नाहीत, ज्या सैनिकांनी शिवसेनेसाठी आपले संसार उध्वस्त करून घेतले त्यांची साधी आठवणही आली नाही त्यामुळेच उद्धव ठाकरे यांची आज ही अवस्था झालेली आहे. मुंबईचे महापौर निवास ज्यांनी घश्यात घातले व मातोश्री-२ चे अनधिकृत बांधकाम कायम करण्याचे काम ज्या देवेंद्र फडणवीस यांनी करून दिले त्यांचे उपकार फार लवकर उद्धव ठाकरेच विसरू शकतो व कृतघ्न होऊ शकतो. कलंक शब्दाचे परिणाम भविष्यात उद्धव ठाकरे भोगावे लागतील", असा इशारा नारायण राणेंनी दिला.