Maharashtra Politics: वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस, सॅफ्रन यांसारखे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातसह अन्य राज्यात गेले. यावरून राज्यात महाविकास आघाडी आणि सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकार यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक आरोप-प्रत्यारोप झाल्याचे दिसून आले. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि नितीन गडकरी यांनी वेदांता-फॉक्सकॉन’, ‘टाटा एअरबस’ प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला का गेले, याबाबत स्पष्टच शब्दांत सांगितले.
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, भारत ही सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. त्यातही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही सर्वात वेगाने वाढत आहे. मी नागपूरचा आहे. आमच्याकडे टालची फॅक्ट्री आहे. जे एअरबस आणि बोईंग दोघांचे सुटे भाग बनवतात. तिथे आता राफेल आणि फाल्कनही बनवत आहेत. उद्योगधंदे अनेक ठिकाणी जातात. उद्योग कुठे स्थापन करायचा कुठे नाही हा गुंतवणूकदाराचा अधिकार असतो. हे राज्याच्या हातात नसते. गुंतवणूकदाराचा अधिकार असतो की उद्योग कुठे सुरु करायचा, असे स्पष्ट मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
सर्वच भागांमध्ये विकास होताना दिसतोय
महाराष्ट्रामध्ये वाहनउद्योगातील कंपन्या आहेत. मर्सिडिज इलेक्ट्रिक कार नुकतीच लॉन्च केली. ती कंपनी पुण्यात आहे. अनेक मोठ्या वाहननिर्मिती कंपन्या पुण्यात आहेत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मूलभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्रात बराच विकास झालेला आहे.आधी विदर्भ, मराठवाडा पिछाडीवर असल्याचा वाद व्हायचा. विदर्भ, मराठवडा आणि कोकणाशी दुजाभाव होत असल्याचा आरोप केला जायचा. पण आता सर्वच भागांमध्ये विकास होताना दिसतोय, असे गडकरींनी नमूद केले.
दरम्यान, टाटांना लिहिलेल्या पत्राबाबत विचारले असता, टाटाचा टाल नावाचा मोठा प्रोजेक्ट मिहानमध्ये नागपूरला घेऊन गेलो. फाल्कन, राफेलचे भाग तिथे बनवतात. हळूहळू क्षमता असेल त्या ठिकाणी उद्योग वाढतात. प्रत्येक जागेच्या काही सकारात्मक आणि नकारात्मक बाबी असतात. कच्चा माल, कर सवलत यासारख्या गोष्टींचाही परिणाम होतो. काही राज्यांमध्ये अधिक करसवल दिली जाते. महाराष्ट्रही गुजरातप्रमाणेच प्रगतीच्या वाटेवर आहे, असे गडकरी यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"