Nitin Gadkari News: आताच्या घडीला देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर शतकी वाटचाल करत आहे. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवरून विरोधक सातत्याने सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडत आहेत. यातच पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून सीएनजी आहे. तसेच बायोफ्युएल, बी एलएनजी, अशा विविध पर्यायांची चाचपणी केली जात आहे. यातच देशात लाखो रोजगार निर्माण होऊ शकतील, गरिबी दूर होऊ शकेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.
एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, चीन, अमेरिका आणि युरोपीय देशांच्या तुलनेत भारतात वाहतुकीचा खर्च खूप जास्त आहे. भारतातील वाहतुकीचा खर्च १६ टक्के एवढा प्रचंड आहे. तर चीनमध्ये तोच दर ८ टक्के आहे आणि अमेरिकेत १२ टक्के एवढा आहे. एलएनजीसारख्या जैव इंधनाच्या माध्यमातून भारताला वाहतुकीचा खर्च ९ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात यश मिळाले, तर भारताची निर्यात दुप्पट होऊन लाखो रोजगार निर्मिती होईल, भारताची गरिबी दूर होईल, असे गडकरी यांनी नमूद केले.
देशाचा शेतकरी एक दिवस इंधन उत्पादन करेल
तत्पूर्वी एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी म्हटले होते की, देशात इथेनॉल आधारित पेट्रोल पंप सुरू होत आहे. देशातील सर्व मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांना इथेनॉल चालणारे वाहन उत्पादन करण्यास लावले आहे. शेतकरी खाद्य पिकांच्या उत्पादन करून श्रीमंत होऊ शकत नाही. तर शेतकऱ्यांनी बायोफ्युएल तयार करणाऱ्या पिकांच्या माध्यमातून इंधन उत्पादनात वाटा द्यावा, त्याच्यातून ते श्रीमंत होऊ शकतात, असे गडकरी यांनी सांगितले.
दरम्यान, देशाचा शेतकरी एक दिवस इंधन उत्पादन करेल, विमानांना उडवण्यासाठी लागणारे एअर फ्युल तयार करेल, असे गेल्या पंधरा वर्षापासून बोलत होतो. शेती क्षेत्रात माझ्यासोबत काम करणारे माझे सहकारी म्हणायचे की, साहेब काहीही बोलतात. माझ्या पाठीमागे माझ्या वक्तव्याची खिल्ली उडवायचे, माझ्यासमोर बोलण्याची त्यांची हिंमत नव्हती, मात्र आता आनंद आहे की, आपल्या देशातील शेतकरी इंधन उत्पादनामध्ये माध्यमातून आपला वाटा देत आहेत, असे गडकरी म्हणाले होते.