Ramdas Athawale Criticized Rahul Gandhi: अमेरिकेत जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षण संपवण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, आदिवासी, ओबीसी, मागासवर्गीयांना संविधानाद्वारे दिलेले आरक्षण कोणीही संपवू शकत नाही. जोपर्यंत सूर्य-चंद्र आहे, तोपर्यंत भारताचे संविधान राहील. संविधानाने दिलेले आरक्षण राहील. आरक्षण संपविण्याचे बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे सांगत खबरदार आरक्षण संपविण्याची भाषा कराल तर असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी दिला आहे.
रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांच्याविरुद्ध राज्यभर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली. १३ सप्टेंबर रोजी मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येणार आहे, असे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी सांगितले.
आरक्षण संपविण्याची भाषा करण्याची राहुल गांधीना गरज काय होती?
सामाजिक दृष्ट्या भारतात सामंजस्य निर्माण झाल्यानंतर सामाजिक आरक्षण संपवण्याचा निर्णय काँग्रेस घेईल, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. या वक्तव्यातून राहुल गांधींनी काँग्रेस ही आरक्षण विरोधी असल्याचेच उघड केले आहे. काँग्रेस सर्वाधिक काळ देशात सत्तेत राहिली आहे. त्यांच्या काळात दलितांवर अधिक अत्याचार झाले आहेत. दलित, आदिवासी, मागासवर्गीयांना संविधानाने दिलेले आरक्षण हे त्यांचे कवच कुंडल आहे. आरक्षण संपविण्याची भाषा करण्याची राहुल गांधीना गरज काय होती, अशी विचारणा रामदास आठवले यांनी केली.
दरम्यान, आरक्षण संपविण्याचा भाषा करणाऱ्या राहुल गांधींना दलित आदिवसी मागासवर्गीय धडा शिकवतील. परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करणे हे काँग्रेस नेते राहुल गांधींचे उद्योग आहेत. भारतात लोकतंत्र नाही, असे परदेशात जाऊन बरळणे चूक आहे. लोकशाही आणि आरक्षणबाबत परदेशात जाऊन चुकीची वक्तव्य करून देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधीचा आम्ही तीव्र निषेध करतो, अशी टीका आठवले यांनी केली.