Ramdas Athawale News: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीला टक्कर देण्यासाठी संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी पुढाकार घेऊन तिसरी आघाडी उघडली आहे. जागावाटप, बैठका यावर भर दिला जात असून, अनेक चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण येत असल्याचे दिसत आहे. यातच केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीला खुली ऑफर दिली असून, त्यासाठी मंत्रीपद सोडण्याची तयारी दाखवली आहे.
एकीकडे विधानसभा निवडणुकीची तयारी वेग घेत असताना दुसरीकडे केंद्र सरकारने एक देश, एक निवडणूक लागू करण्यासाठी पावले उचलली आहेत. यावर प्रतिक्रिया देताना रामदास आठवले यांनी सांगितले की, पूर्वी वन नेशन, वन इलेक्शन अशी प्रणाली होती. संविधानात अशी तरतूद होती. सुरुवातीला काही निवडणूका अशाच पद्धतीने झाल्या आहेत. त्यामुळे देशाचा फायदा होणार आहे, हा हुकूमशाही आणण्याचा विषय नाही. या विधेयकाला माझ्या पक्षाचा पाठिंबा आहे, असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.
प्रकाश आंबेडकरांना मंत्री करण्याची मागणी करेन
रामदास आठवले यांचा पक्ष एनडीएचा घटक पक्ष आहे. यातच रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना एनडीएत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. वंचित बहुजन आघाडीने थोडा सकारात्मक विचार करायला हवा. वंचितने महायुती एनडीएत येणे आवश्यक आहे, त्यांना माझे निमंत्रण आहे. ते महायुतीत आले तर त्यांना सत्तेचा फायदा होईल. ते आले तर मला मंत्री नाही केले तरी चालेल, प्रकाश आंबेडकर यांना मंत्री करा, अशी मागणी मी स्वतः करेन, अशी खुली ऑफर रामदास आठवले यांनी दिली.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत आम्ही महायुतीकडे १० ते १२ जागा मागणार आहोत. विधानसभेला आम्हाला भाजपाच्या कोट्यातून १० ते १२ जागा मिळाव्यात. सरकार आल्यास १ ते २ मंत्रिपदे मिळावीत, महामंडळे मिळावीत, अशी अपेक्षा आहे. विधानसभेत आरपीआयचा विचार करावा, आम्हाला डावलू नये, याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी आम्हाला भाजपाच्या कोट्यातील समजू नये, तिघांनी मिळून जागा द्यावात, अशी अपेक्षा रामदास आठवले यांनी व्यक्त केली.