Maharashtra Politics: अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोस यांनी भारतीय लोकशाहीबाबत केलेले वक्तव्य हे निषेधार्ह आहे. विविध देशांत राजकीय हस्तक्षेप करून अस्थिरता निर्माण करण्याचे कुटील डावपेच जॉर्ज सोरोस करीत असतात. भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा कुटील डाव म्हणून जॉर्ज सोरोस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. मात्र नरेंद्र मोदी हे जगात प्रथम क्रमांकाचे लोकप्रिय नेते आहेत आणि यापुढे जगात प्रथम क्रमांकाचे नेते राहतील. जॉर्ज सोरोससारख्या परदेशी शक्तींना भारतीय लोक भीक घालणार नाहीत, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जगात नंबर वन आहेत. त्यांच्या नेतृत्वात भारत जगातील ५ व्या क्रमांकाचा मोठी अर्थव्यवस्था असणारा देश आहे. G-20 परिषदेचे अध्यक्षपद मोदींच्या नेतृत्वात भारत देशाला मिळाले आहे. पुढील काळात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारत जगातील महासत्ता होईल, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
भारतीय संविधानामुळे भारताची लोकशाही मजबूत
भारतीय संविधानामुळे भारताची लोकशाही मजबूत आहे. अडीज हजार वर्षांपूर्वी भगवान बुद्धांच्या धम्माने बहुजन हिताय बहुजन सुखायचा नारा देऊन लोकशाहीचा मूलमंत्र दिला आहे. त्यामुळे भारतानेच जगाला सर्वप्रथम लोकशाही शिकविली आहे. अमेरिकन जॉर्ज सोरोस यांनी आम्हाला लोकशाही शिकवू नये. परदेशी शक्तींनी कितीही षडयंत्र रचले तरी भारतीय लोकशाही धोका होऊ शकत नाही. सर्व भारतीय प्रसंगी एकजूट होऊन परदेशी शक्तींचा मुकाबला करतील, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अदानी समूहामुळे गुंतवणुकीची संधी असलेला देश या भारताच्या प्रतिमेला धक्का बसला. आता या घडामोडींमुळे भारतातील सत्तेवरील मोदींची पकड सैल होईल आणि सध्या अतिशय आवश्यक असलेल्या संस्थात्मक सुधारणांसाठी दरवाजे उघडले जातील. अदानी समूहाला बसलेल्या धक्क्यांमुळे भारतामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कमुकवत होईल, असे असे विधान अमेरिकी उद्योजक जॉर्ज सोरोस यांनी केले होते. यावर काँग्रेस, भाजपच्या नेत्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"