Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अलीकडेच एका मुलाखतीत मुख्यमंत्री होण्याबाबत इच्छा बोलून दाखवली होती. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. महाविकास आघाडीसह शिंदे गट आणि भाजप नेत्यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यातच आता केंद्रीयमंत्री आणि रिपाइं नेते रामदास आठवले यांनीही यावर थेट शब्दांत भाष्य केले आहे. महाविकास आघाडीत राहून अजित पवार मुख्यमंत्री होणे शक्य नाही, असे रामदास आठवले म्हणाले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, अजित पवार यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी महाविकास आघाडीत राहून अजितदादा कधीही मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. त्यामुळे अजित पवार यांचे जे म्हणणे आहे, ते महाविकास आघाडीत राहून शक्य होणार नाही. अजितदादांना मुख्यमंत्री व्हायचे असेल तर त्यांनी आमच्यासोबत आले पाहिजे. ते महायुती, एनडीएमध्ये आले, तर भविष्यात त्यांचा विचार होऊ शकेल. परंतु, महाविकास आघाडीमध्ये राहून अजित पवार यांना मुख्यमंत्री होणे शक्य नाही, असे रामदास आठवले यांनी स्पष्टपणे सांगितले.
अलीकडेच भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले. या निधनानंतर सदर मतदारसंघात पोटनिवडणूक लागण्यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. याबाबत रामदास आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. भाजपने त्या जागी उमेदवार दिला तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा त्याला पाठिंबा असेल. दिवंगत गिरीश बापट यांनाही आम्ही पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्या जागेबाबत आमची मागणी नाही. ज्यावेळेस भाजप उमेदवार जाहीर करेल. तेव्हा आम्ही सोबत असणार आहोत, असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार आणि पक्ष फोडाफोडीवर सूचक वक्तव्य केले आहे. कोणी राष्ट्रवादी पक्ष फोडायचे काम करत असेल तर ती त्यांची रणनीती असेल, त्यांची भूमिका असेल. आम्हाला काय भूमिका घ्यायची ते आम्ही तेव्हा घेऊ, असे वक्तव्य शरद पवार यांनी करत तसे प्रयत्न करणाऱ्यांना एक प्रकारे तंबीच दिली आहे. अजित पवार यांना फोडण्याचे प्रयत्न सुरु असल्यावर विचारताच पवार यांनी याला नकार दिला नाही. परंतू जे वक्तव्य केले आहे, यावरून राजकीय अर्थ काढले जात आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"