मुंबई : नागपुरात महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. यातच राज्यात राजकीय पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता असल्याचे विधान सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
रामदास आठवले म्हणाले, "महाराष्ट्रात हे दोन महिने भूकंपाचे आहेत. एकदा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा भूकंप झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा झाला. आता कोणाचा होणार आहे, ते आपण पाहणार आहोत. मात्र, कोणता-ना-कोणता भूकंप होण्याची शक्यता आहे."
याशिवाय, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेला सावरकरांचा अवमान शिवसेनेला सहन होत नसेल तर त्यांनी राज्यातील काँग्रेसच्या पाठिंब्यावर स्थापन केलेले सरकार बरखास्त करावे आणि भाजपासोबत पुन्हा सरकार स्थापन करावे. शिवसेना-भाजपा महायुतीचे सरकारच स्थिर आणि टिकाऊ सरकार ठरेल, असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नागपूरात विधिमंडळाच्या आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. राहुल गांधी यांच्या सावकरांविषयीच्या विधानावरून भाजपाने शिवसेनेची कोंडी केली आहे. सावरकरांचा अपमान शिवसेना सत्तेसाठी सहन करीत असल्याचा हल्लाबोलही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
तसेच, ज्यांनी सावरकरांचा अपमान केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांच्या चहापानाला जाणार नाही, असे सांगत विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला. तर नागरिकत्व कायदा हाच मुळात सावरकरांच्या विचारसरणीविरुद्ध असल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
केवळ सहा दिवस चालणा-या या अधिवेशनात सावरकरांच्या अपमानावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधक अत्यंत आक्रमक भूमिका घेतील, असे दिसते. दुसरीकडे जनतेच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा भाजपाचा डाव असल्याची भूमिका घेत, सत्तारूढ महाविकास आघाडी भाजपाला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे.